वृक्षगणना पूर्ण, ३६ हजारांवर वृक्षांची भरपाई बाकी

उच्च न्यायालयात मनपाचे प्रतिज्ञापत्र

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,

nagpur tree census complete शहरातील ९ झोनमधील वृक्षगणना पूर्ण झाली असून ३६ हजारांहून अधिक वृक्षांची भरपाई बाकी आहे. २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीत वृक्षतोडीच्या बदल्यात ८९ हजार ८८६ झाडे लावणे बंधनकारक होते. यापैकी ५३ हजार ८१७ झाडांचे रोपण पूर्ण झाले आहे. परंतु, ३६ हजार ०६९ झाडे लावणे अद्याप बाकी असून संबंधित अर्जदार आणि प्राधिकरणांना मनपातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनपाने उच्च न्यायालयाला दिली. याचिकेवर न्या. अनिल किलोर आणि न्या. रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
 

 nagpur tree census complete 
नागपुरात वृक्ष संवर्धन, वृक्षगणना आणि प्रलंबित वृक्षारोपणासंदर्भात 'स्वच्छ असोसिएशन' द्वारे दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मनपाने उच्च न्यायालयात उत्तर दाखल केले. मनपाच्या वतीने उद्यान उपआयुक्त तथा वृक्ष अधिकारी गणेश राठोड यांनी हे शपथपत्र सादर केले आहे. या याचिकेत नागपूर शहरातील वृक्ष प्राधिकरणाची पुनर्रचना, नियमित बैठका, वृक्षगणनेचे काम पूर्ण करणे, प्रलंबित ९०,००० वृक्षांचे पुनर्रोपण,भरपाई आणि शहरातील ३३ टक्के हरित आच्छादन गाठणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट, याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मृणाल चक्रवर्ती यांनी बाजू मांडली.
वृक्षगणनेची सद्यस्थिती
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ नुसार मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. 'टेराकॉन'या संस्थेमार्फत नागपूर शहरातील वृक्षगणनेचे काम सुरू आहे. मनपाच्या १० झोनपैकी ९ झोनमधील वृक्षगणना पूर्ण झाली असून केवळ मंगळवारी झोनचे काम अंतिम टप्प्यात आहे. ८ सप्टेंबर २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार शहरात एकूण ४३,६९,३६० (सुमारे ४३.६९ लाख) वृक्षांची नोंद झाली आहे.
असा आहे 'नीरी' चा अहवाल
'नीरी' च्या २०२४-२५ च्या पर्यावरण स्थिती अहवालानुसार शहरात '३-३०-३००' हा नियम लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरातून किमान ३ मोठी झाडे दिसली पाहिजेत. प्रत्येक परिसरात किमान ३० टक्के कॅनोपी आच्छादन असावे.
घरापासून ३०० मीटरच्या आत हरित जागा , उद्यान असावे. मनपाच्या आगामी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या शिफारशींवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे कोर्टात स्पष्ट करण्यात आले आहे.
नागपूर शहरातील वाढते बांधकाम क्षेत्र
'नीरी'च्या शास्त्रज्ञ डॉ. शालिनी ध्यानी यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारानुसार नागपूरचे बांधकाम क्षेत्र २००५ मधील ७०.२७ चौ. किमी वरून २०२५ पर्यंत १४०.५३ चौ. किमी पर्यंत (दुप्पट) वाढले आहे. यामुळे मोकळ्या आणि हिरवळीच्या जागांचे निवासी व व्यावसायिक क्षेत्रात रूपांतर झाल्याचे मान्य करण्यात आले आहे.