अट्टल घरफोड्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

११ लाखाचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
वाशीम,
police-handcuff-notorious-burglar बंद घरांची कुलूपे तोडून धुमाकूळ घालणारा कुख्यात घरफोड्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अत्यंत शिताफीने कारवाई करत दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटनांचा यशस्वी उलगडा केला. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून ११ लाख ५ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
 
police-handcuff-notorious-burglar
 
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२५ रोजी सिव्हिल लाईन परिसरातील इरिगेशन कॉलनीतील रहिवासी सिताराम सखाराम वाशीमकर (वय ६५) आणि योजना पार्क येथील रहिवासी अरुण रामराव सरनाईक (वय ५९) यांच्या बंद घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी वाशीम शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याचे निर्देश दिले होते.
 
 
त्या अनुषंगाने एलसीबीच्या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पुसद येथील सराईत चोरटा रॅन्डो उर्फ फिरोज खान साहेब खान (वय ३६) रा. मुखरी चौक, तुकाराम बापू वार्ड, पुसद, जि. यवतमाळ या संशयिताचे नाव समोर आले. एलसीबीच्या पथकाने तत्परता दाखवत सापळा रचला आणि आरोपी रॅन्डोला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने दोन्ही घरफोड्या केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेला ७ तोळे सोनं आणि ९ तोळे चांदी असा एकूण ११ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
 
 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, शेखर मास्कर, पोलीस अंमलदार गजानन अवगळे, दिलीप देवकते, विनोद अवगळे, भूषण ठाकरे, विठ्ठल महाले, तुषार ठाकरे, संदीप दुतोंडे, अविनाश वाढे, संतोष वाघ, शाम इंगळे, सुनील तायडे तसेच अंगुली मुद्रा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष भोंडे, संदीप सरोदे, महेश आकरे, शीतल मानकर आणि गणेश ब्रिंगल यांनी पार पाडली.