पुणे
pune ganesh visarjan 2026 महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. येत्या २५ सप्टेंबरला, शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप दिला जाणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ही विशेष आकर्षणाचा विषय मानली जाते. यंदा या मिरवणुकांदरम्यान होणारी गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनाची माहिती दिली. यंदा कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यावरून मिरवणूक काढण्यासाठी शहरातील १५० गणेश मंडळांना कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांसाठी या दोन्ही रस्त्यांवरून स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आला आहे. शहराच्या इतर भागातील मंडळांना या मार्गावरून मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरील मिरवणुकीत यंदा केवळ निर्धारित १५० मंडळांचाच सहभाग असेल.
गणेश विसर्जन सोहळ्यासाठी पुणे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून तब्बल १० हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मिरवणुकीच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर असतील. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार प्रमुख मार्गांवरून एकूण ६३८ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होणार आहेत. गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील विविध भागांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. विसर्जन सोहळ्यासाठी शहरात २६ ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत पोलिसांकडून आतापर्यंत सुमारे साडेचार हजार प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस दलाची सर्व तयारी पूर्ण झाली असून यंदाचा सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पद्धतीने पार पडेल, असा विश्वास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विसर्जन मिरवणुकीमुळे होणारे वाहतूक बदल आणि प्रमुख गणपती मंडळांच्या मिरवणुकींची सद्यस्थिती नागरिकांना एका क्लिकवर समजावी यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे. Punepolice.gov.in या