बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या मातोश्री कृष्णा मुखर्जी यांचे निधन

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
मुंबई
krishna mukerji बॉलिवूड जगतातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या आई श्रीमती कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी निधन झाले आहे. मंगळवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
 

rani mukerji 
या दुःखाद घटनेची माहिती देताना यशराज फिल्म्सच्या टीमने मंगळवारी, बावीस सप्टेंबर रोजी एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही अत्यंत दुःखी अंतःकरणाने कळवत आहोत की, राणी मुखर्जी यांच्या आई श्रीमती कृष्णा मुखर्जी (वय ७५ वर्षे) यांचे आज दुपारी निधन झाले आहे. या कठीण प्रसंगी सर्वांनी दाखवलेले प्रेम, पाठिंबा आणि प्रार्थनांबद्दल कुटुंबीय ऋणी आहेत. या दुःखाच्या काळात कुटुंबाच्या खाजगीपणाचा सर्वांनी आदर करावा, ही नम्र विनंती.”
कृष्णा मुखर्जी यांचा संबंध थेट कलाविश्वाशी जोडलेला होता. त्या एक पार्श्वगायिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांनी बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये अनेक प्रसिद्ध गाणी गायली होती. त्यांचे पती आणि राणी मुखर्जी यांचे वडील राम मुखर्जी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक तसेच प्रसिद्ध फिल्मालय स्टुडिओचे सह-संस्थापक होते. राणी मुखर्जी यांच्या संपूर्ण अभिनय प्रवासात आणि त्यांच्या यशामागे त्यांच्या आईचा अत्यंत मोलाचा आणि महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. कृष्णा मुखर्जी यांच्या जाण्याने मुखर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार तसेच चाहत्यांनी पुढे येत मुखर्जी कुटुंबाप्रती तीव्र शोक आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत.