‘लाली लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येत नाही’

रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यात पुन्हा जुंपली

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
मुंबई
rupali thombre patil राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणावरून यापूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यावरून ठोंबरे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना चाकणकर यांनीही ठोंबरे पाटील यांच्यावर बोचरी टिप्पणी केली आहे.
 

rupali chakankar vs rupali thombre patil ncp leaders clash over savitribai phule remark 
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले होते. अशोक खरात यांच्यासोबतचा त्यांचा एक फोटो समोर आल्यानंतर या प्रकरणाबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील या दोन महिला नेत्यांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला होता.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत भूमिका मांडताना स्वतःची तुलना सावित्रीबाई फुले यांच्याशी केली. आपल्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असून ते विविध ठिकाणी खोटे ठरल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्राची लेक म्हणून आपण खोट्या आरोपांना बळी पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या चारित्र्यावर करण्यात येणारे आरोप हे सावित्रीबाई फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी सहन केलेल्या आरोपांसारखे असल्याचे चाकणकर म्हणाल्या. ‘सावित्रीची लेक’ म्हणून आपण या संघर्षाचा सामना करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
चाकणकर यांच्या या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, असे सांगत चाकणकर यांना सावित्रीबाईंचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले.
राज्य महिला rupali thombre patil  आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना महिलांना संरक्षण आणि आधार देण्याची जबाबदारी असतानाही महिलांना भोंदूबाबांच्या जाळ्यात पोहोचविण्याचा आरोप ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्यावर केला. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
याच टीकेला प्रत्युत्तर देताना रुपाली चाकणकर यांनी ठोंबरे पाटील यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची बोचरी टिप्पणी केली. ‘लाली लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येते असे नाही,’ अशा शब्दांत त्यांनी ठोंबरे पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अशोक खरात प्रकरणापासून सुरू झालेला हा वाद आता सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या उल्लेखापर्यंत पोहोचला असून, दोन्ही बाजूंनी एकमेकींवर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादीतील या अंतर्गत संघर्षाला पुन्हा धार आली आहे.