कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, पण पीककर्ज मंजुरी संथगतीने

अर्धा हंगामही शेवटच्या टप्प्यात

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
अल्लीपूर,
second-loan-waiver-list-released पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत कानगावच्या बँक ऑफ इंडिया शाखेअंतर्गत कर्जमाफीच्या पहिली यादीत ४९० शेतकर्‍यांची नावे आहेत. त्यापैकी ४१३ शेतकर्‍यांच्या खात्यात रकम जमा झाली. सध्या २१७ शेतकर्‍यांचे पीक कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता कर्जमाफीची दुसरी यादीही जाहीर झाली असताना मात्र पीककर्ज मंजुरीची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. अर्धा हंगामही शेवटच्या टप्प्यात असून पीककर्जाची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यत केला आहे.
 
 
 
दरम्यान, मंगळवारी बँक ऑफ इंडिया शाखा कानगावचे शाखा व्यवस्थापक रोशन कुरील यांच्यासोबत माजी आमदार जयप्रकाश छाजेड, एसटी वर्कर्स काँग्रेस कमिटीचे प्रदेश सहसचिव तथा गाडेगावचे माजी सरपंच शालिक ताकसांडे यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफी आणि कर्ज प्रकरण तातडीने निकाली काढण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
 
 
थकीत कर्जदार असणार्‍या शेतकर्‍यांना शासनाने २ लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. कानगाव बँक ऑफ इंडिया शाखेंतर्गत २ हजार ९९३ शेतकरी थकीत कर्जदार आहेत. त्यापैकी सन २०२५-२६ चे नियमित कर्जदार १६४५ तर थकीत कर्जदारांची संख्या १३४८ आहे. याशिवाय २१७ शेतकर्‍यांची पीक कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नुकतीच ११४५ थकीत कर्जदारांची दुसरी यादी बँकेत लावण्यात आली. यादीत नाव असणार्‍या शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण करून बँकेत सादर करावे, असे आवाहन बँकेचे शाखा व्यवस्थापक रोशन कुरील यांनी केले आहे.
 
 
कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अत्यंत संथगतीने सुरू असून कानगावच्या बँक ऑफ इंडिया शाखेत दोनदा पात्र शेतकर्‍यांची यादी लावण्यात आली. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणार्‍या शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यात आली. या परिसरातील बरेच शेतकरी इ-केवायसी करण्याकरिता आधार केंद्रावर चकरा मारताना दिसतात. मात्र, केंद्र प्रमुख सर्व्हर डाऊनचे कारण पुढे करून परत पाठवतात. या खेळखंडोब्यात शेतकर्‍यांचा वेळ जातो. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष खदखदत आहे. कर्जमाफीची रकम खात्यात तातडीने जमा झाली आणि नव्याने पीक कर्ज उचलण्यासाठी शेतकर्‍याची लगबग दिसून येत आहे. अर्धा खरीप हंगाम संपल्यात जमा आहे. ऑगस्ट, सप्टेंबर संपत येत असतानाही शेतकर्‍यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. कानगाव परिसरातील ज्या शेतकर्‍यांचे पीक कर्ज थकीत आहे आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव समाविष्ट आहे, अशा शेतकर्‍यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी आमदार जयप्रकाश छाजेड, शालिक ताकसांडे यांनी शाखा व्यवस्थापकाकडे केली आहे.