अनिल कांबळे
नागपूर,
share trading scam इन्स्टाग्रामवरील शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या जाहिरातीला बळी पडलेल्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाची सायबर ठगांनी तब्बल २ कोटी ८७ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केली. भरघोस परताव्याचे आमिष दाखवून टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवण्यास भाग पाडल्यानंतर रक्कम परत मागितल्यावर कर व अन्य शुल्काच्या नावाखाली पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शास्त्रज्ञाने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. कप्पू सामी (४०) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून बजाजनगर परिसरात राहतात.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कप्पू सामी यांना इन्स्टाग्रामवर शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील जाहिरात दिसली. जाहिरातीच्या माध्यमातून संपर्क साधणाऱ्या आरोपींनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना ‘एफटीएमओ’ नावाच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपवर आरोपी स्वतःला शेअर बाजारातील तज्ज्ञ असल्याचे भासवत गुंतवणूक व ट्रेडिंगबाबत मार्गदर्शन करीत होते. यानंतर आरोपींनी कप्पू सामी यांना कथित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या लिंक पाठवून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सांगितले. मोठ्या परताव्याच्या आशेने त्यांनी विविध व्यवहारांतून एकूण २ कोटी ८७,२९,००० रुपये जमा केले. काही काळानंतर त्यांनी गुंतवलेली रक्कम आणि नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी पैसे देण्याऐवजी कर, शुल्क आदींच्या नावाखाली आणखी रक्कम मागितली. गुंतवलेले पैसे तसेच नफा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून बँक खात्यांसह डिजिटल व्यवहारांचा माग काढला जात आहे.