SIRच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवर काँग्रेसचा आक्षेप

रामटेक लोकसभा मतदारसंघात २५,८०१ दुबार नोंदी आढळल्याचा काँग्रेसचा दावा

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
नागपूर,
sir-2026-ramtek-voter-listSIR 2026 अंतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मतदार तसेच बूथ पातळीवरील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्राप्त तक्रारींची पडताळणी केल्यानंतर विविध स्वरूपाच्या त्रुटी निदर्शनास आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

sir 
या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार श्याम बर्वे यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक आणि प्रफुल्ल गुढधे यावेळी उपस्थित होते.
 
काँग्रेसच्या दाव्यानुसार, रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रारूप मतदार यादीच्या तपासणीत २५,८०१ दुबार मतदारांच्या नोंदी आढळून आल्या आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय कामठीमध्ये ११,९००, हिंगणा ७,०८५, सावनेर १,९९४, काटोल १,७८०, रामटेक १,३२२ आणि उमरेडमध्ये १,७२० अशा नोंदी असल्याचा दावा करण्यात आला.
 
SIR प्रक्रियेत मतदारांचे पुनर्निरीक्षण, पडताळणी आणि मॅपिंग करण्यात आले होते. एका मतदाराची नोंद एकाच मतदान केंद्राच्या यादीत राहावी, या उद्देशाने मॅपिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी आढळत असल्याने मॅपिंग व पडताळणी प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
 
याशिवाय मतदारांच्या नावांमध्ये चुका, नवीन छायाचित्रे देऊनही जुने फोटो कायम राहणे किंवा फोटो उपलब्ध नसणे, मॅपिंग व Enumeration Form संदर्भातील विसंगती तसेच काही नावे ऑनलाइन मतदार यादीत दिसत नसल्याच्या तक्रारी असल्याचे काँग्रेसने सांगितले.
 
काही प्रकरणांमध्ये संबंधित मतदाराचे मॅपिंग आणि EF-Form एकाच मतदान केंद्राशी संबंधित असतानाही त्याचे नाव दोन वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये आढळल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणांची तांत्रिक आणि प्रशासकीय पातळीवर सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
 
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
दुबार मतदारांच्या नोंदींची विधानसभा व मतदान केंद्रनिहाय तपासणी करावी, दोन ठिकाणी मॅपिंग झालेल्या नोंदींची स्वतंत्र चौकशी करावी, तसेच Enumeration Form आणि प्रारूप मतदार यादीतील माहितीची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
 
नवीन फोटो देऊनही फोटो अपडेट न झालेल्या मतदारांची तपासणी, मॅपिंग व EF-Form संदर्भातील सर्व नोंदींची पडताळणी आणि एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी आढळल्यास त्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.
 
मतदारसंघनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्व आवश्यक दुरुस्त्या करून अचूक व पारदर्शक मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.