नवी दिल्ली/मुंबई
supriya sule केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात आयोगातील त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रारी केल्याचे समोर आले आहे. विशेषतः विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात SIR प्रक्रियेबाबत आयोगाकडून करण्यात आलेल्या दाव्यांनंतर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत, या प्रकरणाकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता लोकशाही आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली.
दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आयोगातीलच व्यक्ती संस्थेच्या कामकाजाबाबत आरोप करत असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. “आमच्यावर अन्याय झाला, उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला, हा राजकीय मुद्दा आहे; तो काही काळ बाजूला ठेवूया. मात्र सामान्य नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांमध्येच गल्लत होत असेल, तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. हा केवळ राजकीय विषय नसून लोकशाहीसाठी घातक विषय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावर सरकारने तातडीने सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावून मोकळेपणाने चर्चा करावी, अशी मागणीही सुळे यांनी केली. निवडणूक आयोगाविरोधातील आरोप हे बाहेरच्या व्यक्तींनी नव्हे, तर आयोगातीलच व्यक्तींनी केल्याचे त्या म्हणाल्या. “ही यंत्रणाच कोसळत असेल, तर विश्वास कुणावर ठेवायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा का, असा प्रश्न विचारण्यात आला असता सुळे यांनी नैतिकतेचा दाखला देत भूमिका मांडली. “नैतिकता दाखवली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या मते, हा प्रश्न केवळ एखाद्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या राजकीय हिताशी संबंधित नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराशी निगडित आहे. सशक्त लोकशाहीच्या दृष्टीने सध्याच्या घडामोडी धक्कादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारताकडे जगातील मोठी supriya sule लोकशाही म्हणून पाहिले जाते. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळावा आणि प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. याच उद्देशातून निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे, असे सुळे यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निर्णयांमुळे आपण आणि उद्धव ठाकरे यांनी बरंच काही सहन केले असल्याचा उल्लेख करत, “त्याच निवडणूक आयोगाला मोडून काढण्याचे हे पाप आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.दरम्यान, या विषयावर इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता असल्याचेही सुळे यांनी सूचित केले. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या प्रकरणाची सविस्तर चर्चा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. मतदानाचा अधिकार हा नागरिकांच्या लोकशाही अधिकारांचा केंद्रबिंदू असून, निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अबाधित राहणे आवश्यक असल्याचे त्यांच्या वक्तव्याचा सूर होता.याच पत्रकार परिषदेत सुळे यांनी मराठवाड्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरही भाष्य केले. उशिरा का होईना, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर जाणार असल्याचे स्वागतार्ह असल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवार यांनी केलेल्या पत्रव्यवहारानंतर हे दौरे सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला.रोहित पवार, जयंत पाटील आणि अनिल देशमुख हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत असल्याचे सुळे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हेदेखील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. सरकारच्या दौऱ्यांमधून केवळ पाहणी न होता शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्ष आणि ठोस मदत पडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दुष्काळासारख्या गंभीर संकटाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वांनी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.