आयपीएल लिलावाचा ‘गोवा’ प्लॅन!

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
मुंबई,
the-goa-plan-for-the-ipl-auction आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी सुरू असतानाच लिलावाच्या ठिकाणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी यंदाचा आयपीएल लिलाव डिसेंबरमध्ये गोव्यात आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. मागील काही वर्षांत लिलाव परदेशात घेण्यात आला होता. यंदा मात्र लिलाव भारतातच आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन आयपीएल लिलावांचे आयोजन सौदी अरेबिया, दुबई आणि अबू धाबी येथे करण्यात आले होते. त्यानंतर यंदाचा लिलाव भारतात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असून गोव्याची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. लिलावाची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
 
ipl
 
दरम्यान, भारत ‘अ’ महिला आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ महिला संघांदरम्यान होणाऱ्या आगामी टी-२० सामन्यांच्या ठिकाणातही बदल करण्यात आला आहे. धर्मशाळेतील प्रतिकूल हवामान आणि सततच्या पावसामुळे हे सामने मोहालीला हलवण्यात आले आहेत. हवामानामुळे सामन्यांमध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सैकिया यांनी सांगितले. भारत आणि जपान यांच्यात झालेल्या ऐतिहासिक टी-२० सामन्याबाबतही सैकिया यांनी भाष्य केले. हा सामना दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले. भारत आणि जपानच्या पुरुष संघांमधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. २२ सप्टेंबर रोजी जपानमधील तोचिगी प्रांतातील सानो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर हा सामना झाला.
 
भारत-जपान सामन्याच्या आयोजनामागे आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या पुढाकाराचाही उल्लेख सैकिया यांनी केला. जपानमध्ये क्रिकेटला अधिक प्रोत्साहन मिळावे आणि पूर्व आशियातील नव्या प्रेक्षकांपर्यंत हा खेळ पोहोचावा, या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांच्या ७५व्या वर्षानिमित्त या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.