शिरपूर, धोंडगाव शिवारात वाघिणीचा मुक्त संचार

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
समुद्रपूर
tigress-roams-freely
तालुक्यात वाघांनी चांगलीच दहशत निर्माण केली असून वनविभागाकडून पवनगाव परिसरातील वाघिणीला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे गिरड वनपरिक्षेत्रातील शिरपूर व धोंडगाव परिसरातील शेतशिवारात वाघिणीचा मुक्त संचार आढळून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
tigress
 
वाघिणीच्या हालचालींची माहिती मिळताच उपवनसंरक्षक हरवीर सिंग, सहायक वनसंरक्षक हरीश सरोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांच्या नेतृत्वात वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आले आहेत. ही वाघीण कदाचित जंगल सोडून भटकत असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी शेतशिवारात एकट्याने जाऊ नये तसेच रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी, कुठेही वाघीण दिसताच वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.