नागपूर,
VNIT Virasat 2026भारताच्या समृद्ध शास्त्रीय कला व सांस्कृतिक परंपरेची ओळख युवा पिढीला करून देण्याच्या उद्देशाने स्पिक मॅके, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व विश्वेश्वरया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विरासत – हेरिटेज फेस्ट’ या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे गुरुवार, 24 सप्टेंबर पासून आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस व्हीएनआयटीच्या सभागृहात चालणा-या या महोत्सवात कार्यशाळा, मास्टरक्लास आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विद्यार्थ्यांना मेजवानी मिळणार आहे.
24 ते 26 तारखेदरम्यान, 9 ते 12 व 2 ते 5 वाजेदरम्यान दोन सत्रात लघुचित्रकला, कथ्थक आणि हिंदुस्थानी गायन या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. डॉ. स्नेह गांगल लघुचित्रकला कार्यशाळा घेणार असून, जयपूर घराण्याचे नामवंत कथ्थक नर्तक आणि २००३ चे संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त पं. राजेंद्र गंगानी कथ्थक कार्यशाळेचे मार्गदर्शन करतील. पं. कुमार गंधर्व आणि विदुषी वसुंधरा कोमकली यांच्या कन्या व शिष्या विदुषी कलापिनी कोमकली हिंदुस्थानी गायन कार्यशाळा घेणार आहेत. त्यांना २०२३ मध्ये हिंदुस्थानी गायनासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महोत्सवातील सायंकालीन संगीत मैफलींमध्ये सायंकाळी 6 वाजता व्हीएनआयटीच्या सभागृहात २४ सप्टेंबर रोजी पं. राजेंद्र गंगानी, २५ सप्टेंबर रोजी विदुषी कलापिनी कोमकली आणि २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध सतारवादक पं. कुशल दास यांचे सादरीकरण होणार आहे. व्हीएनआयटीचे संचालक प्रा. प्रेम लाल पटेल तसेच संस्थेचे अधिष्ठाता महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. डॉ. अर्घ्य मित्र आणि डॉ. सारिका बहादूर व्हीएनआयटी हेरिटेज क्लबच्या विद्यार्थ्यांसह महोत्सवाचे समन्वयन करीत आहेत.