जागतिक पर्यटन दिनानिमित्त ज्येष्ठांना २० टक्के सवलत

एमटीडीसीतर्फे २७ सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
नागपूर,
world-tourism-dayजागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटकांसाठी विविध उपक्रमांसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत जाहीर केली आहे. महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये सोमवार ते गुरुवार ज्येष्ठ नागरिकांना २० टक्के सवलत मिळणार आहे. याशिवाय शासकीय कर्मचारी, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठीही विविध सवलती उपलब्ध आहेत. या सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन एमटीडीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश पाटील यांनी केले आहे.
 
turism
 
व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांच्या सूचनेनुसार २७ सप्टेंबर रोजी महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयांसह पर्यटक निवास, उपहारगृहे, बोट क्लब, कलाग्राम आदी ठिकाणी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. यंदाची संकल्पना ‘डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पर्यटनाची पुनर्रचना’ असून, त्यानिमित्त २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता एमटीडीसी हॉटेल, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हिल लाइन्स येथे तज्ज्ञांच्या सहभागाने परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
 
 
विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा, तर पर्यटकांसाठी पारंपरिक खेळ, नेचर वॉक, जंगल ट्रेल, हेरिटेज वॉक आणि बर्ड वॉचिंग यांसारखे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पर्यटक निवासांमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार असून, विविध पर्यटनस्थळांची माहितीही दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ०७१२-२५३३२५ या क्रमांकावर श्रीमती पूजा कांबळे यांच्याशी किंवा ronagpur@maharashtratourism.gov.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.