भद्रावती
youth-murdered ठेकेदारीच्या कामावर दुचाकीवरून जात असलेल्या युवकाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून अज्ञात व्यक्तींनी त्याची हत्या केली. ही घटना बुधवार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 सुमारास येथील नागमंदिर चौकात घडली. वर्दळीच्या ठिकाणी आणि नागरिकांच्या उपस्थितीत भररस्त्यावर हा हल्ला झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
उमदेव भावराव मेश्राम (40, रा. देऊरवाडा, भद्रावती, हल्ली मुक्काम शिवाजीनगर, प्रज्ञा वाचनालयाजवळ, भद्रावती) असे मृतकाचे नाव आहे. या हत्यांकाडातील मुख्य आरोपी श्रेयस पुल्ली याला पोलिसांनी पडोली येथून अटक केली आहे. तर वैभव पुल्ली आणि त्याचा काका प्रकाश अण्णा पुल्ली यांनाही ताब्यात घेतले गेले आहे.
बांधकाम मजूर असलेले उमदेव मेश्राम हे बुधवारी सकाळी दुचाकीने घरून कामावर जाण्यासाठी निघाले होते. ते नागमंदिर चौकाजवळ पोहोचताच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या मानेवर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले असून, मृतदेह विच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
हत्याकांडानंतर पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासातून संशयितांची नावे समोर आल्यानंतर वैभव पुल्ली आणि प्रकाश अण्णा पुल्ली यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी श्रेयस पुल्ली यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून श्रेयस पुल्ली याला पडोली येथून अटक केली.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अथवा ताब्यात घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीची नेमकी भूमिका काय होती, हत्येचे कारण काय होते, हल्ल्याचे नियोजन कसे झाले आणि या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.