युवकाची भररस्त्यात धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

नागमंदिर चौकातील थरारक घटना संशयिताच्या काका व भावाला पोलिसांनी घेतले ताब्यात

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
भद्रावती,  
Youth murdered in Chandrapur दुचाकीवरून ठेकेदारीच्या कामावर जात असलेल्या 40 वर्षीय युवकावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने मानेवर वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 सुमारास येथील नागमंदिर चौकात घडली. वर्दळीच्या ठिकाणी आणि नागरिकांच्या उपस्थितीत भररस्त्यावर हा हल्ला झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमदेव भावराव मेश्राम (40, रा. देऊरवाडा, भद्रावती, हल्ली मुक्काम शिवाजीनगर, प्रज्ञा वाचनालयाजवळ, भद्रावती) असे मृतकाचे नाव आहे. बांधकाम मजूर असलेले उमदेव मेश्राम हे बुधवारी सकाळी दुचाकीने घरून कामावर जाण्यासाठी निघाले होते. ते नागमंदिर चौकाजवळ पोहोचताच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या मानेवर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती कळताच भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले.
 
 

htya 
 
 
दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात एका संशयिताचे नाव समोर आल्याची माहिती असून, संशयित वैभव पुल्ली याचा काका व लहान भाऊ यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली आहेत.हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, हत्यामागे पूर्ववैमनस्य आहे का, तसेच या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास भद्रावती पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच अन्य उपलब्ध बाबींच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी उमदेव मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. भद्रावती शहरात वर्दळीच्या ठिकाणी सकाळच्या सुमारास घडलेल्या या हत्याकांडामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मात्र, भद्रावती गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. मुख्य संशयिताला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.