अहिल्यानगर
ahilyanagar bhingar ganesh visarjan अहिल्यानगरजवळील भिंगार शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शुल्केश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष दीपर वागस्कर यांचा मृत्यू झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या मृत्यूच्या कारणावरून मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज भिंगार शहर बंद ठेवण्यात आले असून, गणेश विसर्जनही स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. या कारवाईत वागस्कर यांना मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्यांचा जीव गेल्याचा आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.मात्र, पोलीस प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मिरवणुकीदरम्यान वागस्कर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यानंतर ते खाली कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लाठीचार्ज आणि वागस्कर यांच्या मृत्यूचा कोणताही संबंध नसल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, वागस्कर यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रुग्णालय किंवा पोलीस प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून, घटनेचा तपास सुरू आहे. त्यामुळे मृत्यूमागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.या घटनेनंतर भिंगारमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार संग्राम जगताप, हिंदुत्ववादी संघटना आणि शहरातील सर्व गणेश मंडळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होईपर्यंत गणेश विसर्जन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून आज भिंगार शहर बंद ठेवण्यात आले आहे.