मुंबई
ajay devgn अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्याशी संबंधित एक महत्त्वाची बाब समोर आली असून, प्रस्तावित सलून आणि स्पाच्या कामावर मुंबई महापालिकेने ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावली आहे. संबंधित जागेचा व्यावसायिक वापर करण्यासाठी आवश्यक परवानग्या उपलब्ध नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
अजय देवगणचा बंगला जुहूतील कापोले को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे. या बंगल्यात सलून आणि स्पासाठी काही काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोसायटीकडून याबाबत तक्रार करण्यात आली. तक्रारीनंतर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी केली. त्यावेळी मालमत्ताधारकांकडे या कामासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि परवानग्या आहेत का, याची पडताळणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अथवा परवानग्या सादर करण्यात आल्या नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर महापालिकेच्या के-पश्चिम विभागाने संबंधित बांधकाम अथवा सुरू असलेले काम तातडीने थांबवण्याचे निर्देश देणारी नोटीस बजावली.
या संपूर्ण प्रकरणात निवासी मालमत्तेच्या वापराचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. महापालिकेच्या नियमांनुसार निवासी मालमत्तेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करायचा असल्यास त्यासाठी संबंधित विभागाच्या आवश्यक परवानग्या आणि मंजुरी घेणे अपेक्षित असते. त्यामुळे सलून आणि स्पासाठी जागेचा व्यावसायिक वापर करण्यापूर्वी आवश्यक मंजुरी घेण्यात आली आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे.महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या सादर करण्यास सांगितल्यानंतरही ती उपलब्ध न झाल्याने पुढील कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, अजय देवगणच्या कुटुंबाने या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी महापालिकेकडे चार आठवड्यांचा वेळ मागितल्याचे समजते.आता या मुदतीत अजय देवगणच्या कुटुंबाकडून संबंधित कागदपत्रे आणि आवश्यक परवानग्या महापालिकेसमोर सादर केल्या जातात का, याकडे लक्ष लागले आहे. त्यानंतर महापालिका या प्रकरणी कोणता निर्णय घेते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.जुहू परिसर हा बॉलिवूडमधील अनेक नामवंत ajay devgn कलाकारांच्या आलिशान निवासस्थानांसाठी ओळखला जातो. कापोले को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्येही अनेक प्रसिद्ध व्यक्तींची घरे आहेत. त्यामुळे अजय देवगणच्या बंगल्याशी संबंधित महापालिकेच्या या कारवाईने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.