अमरावती
amravati university संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, विद्यापीठाला ऊर्जा संवर्धनासाठी १६ वा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था अमरावती विभागाचे महाव्यवस्थापक अभिजित हिंगे यांनी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांना सदर पुरस्कार प्रदान केला.
पुरस्कार स्वीकारतेवेळी प्र- कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सी. ए. पुष्कर देशपांडे, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, उपअभियंता (विद्युत) राजेश एडले, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, कनिष्ठ अभियंता आकाश सोळंके तथा अभियांत्रिकी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सौर ऊर्जेसाठी विद्यापीठ परिसरात ५७६ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला असून या माध्यमातून संपूर्ण विद्यापीठ परिसरात स्वच्छ ऊर्जेचा पुरवठा करण्यात येतो. पारंपरिक विद्युत उपकरणांपैकी ६५ टक्के उपकरणे स्टार लेबल आणि एनर्जी सेव्हर उपकरणांमध्ये बदलण्यात आली आहेत. विद्यापीठ परिसरात ९० टक्के एलईडी स्ट्रीट लाईट्स आहे. ऊर्जाबचतीसाठी ५० टक्के सिलिंग फॅन हे ऊर्जा बचत करणाऱ्या बीएलडीसी सिलिंग फॅनमध्ये बदलण्यात आले आहे. परिसरातील कार्बन उत्सर्जन लक्षात घेता वरील सर्व उपायांमुळे दरवर्षी सुमारे ६०० टन कार्बन उत्सर्जन सद्य:स्थितीत नियंत्रित केले जात आहे.
विद्यापीठातील विविध विभागांच्या एकूण वीज मागण्यांपैकी ५५ टक्के वीज ही परिसरात उभ्या असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे पूर्ण केली जाते. या व्यतिरिक्त पाणी व वृक्ष संवर्धनामध्ये विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी केली असून, भूजल पुनर्भरण करण्यासाठी २ मोठी जलाशये आणि ६ शेततळी तयार करण्यात आली आहेत. २० मोठ्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविण्यात आले आहे. या माध्यमातून परिसरातील सर्व विभागांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येतो.
वृक्ष संवर्धनामध्ये विद्यापीठाने भरीव कामगिरी केली असून,२.७५ लाख झाडे परिसरात लावण्यात आली आहे. तसेच झाडांची पाने, जैविक कचरा यापासून खत निर्मिती करण्यासाठी कंपोस्ट खड्डे देखील तयार करण्यात आले आहे. या विविध पर्यावरणपूरक आणि ऊर्जा संवर्धनाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेतर्फे हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. याप्रसंगी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.