भंडारा,
bhandara शासन कितीही चांगले काम करीत असले तरी, स्थानिक पातळीवर ज्यांना त्याची अमलबजावणी आणि नियाेजन करावयाचे असते, त्यांची मानसिकता काय? यावर बरेच काही अवलंबून असते. अशावेळी वरिष्ठांकडून आलेल्या कार्यक्रमांची खानापूर्ती करणे, याच प्रकार हाेताे. याचाच अनुभव आज भंडाऱ्यात आला. राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून गणेशाेत्सवाच्या निमित्त आयाेजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा जिल्हा प्रशासनाने केवळ कुळाचार केला. कार्यक्रम सर्वसामान्य भंडारेकरांसाठी हाेता, परंतू त्यांनाच कार्यक्रम असल्याची माहिती नव्हती. प्रेक्षक म्हणून अधिकारी, कर्मचारी आणि काही बचत गटांच्या महिलांचे मुखवटे हाेते.

माध्यमांनाही कार्यक्रमाचे निराेप नसण्यापर्यंत वेळ येत असेल तर यापेक्षा प्रशासनाचा बिनधास्तपणा काय असू शकताे?महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून महाराष्ट्राची संस्कृती, प्रथा, परंपरा नव्या पिढीपर्यंत पाेहचाव्या आणि त्या रुजाव्यात म्हणून सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वात उत्तम कामगिरी करीत आहे. वेगवेगळया सण, उत्सवांचे औचित्य साधून त्याला साजेशी सांस्कृतिक रचना महाराष्ट्रातील जनतेपूढे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनतेने ते बघावे, असे अपेक्षीत आहे. पण हेच प्रशासनातील काही ‘कुळाचारी’ अधिकाऱ्यांना मान्य नसावे. कारण आज जे भंडारेकरांनी अनुभवले, ते हीच मानसिकता दाखविणारा आहे. गणेशाेत्सवाच्या निमित्ताने ‘गणपत्ती बाप्पा माेरया’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयाेजन करण्याचे निर्देश संचालनालयाकडून आले. यात भक्तीगीते, पारंपारीक नृत्य, संगीत याचे सादरीरण हाेते. स्थानिक कलावंत आपली कला यातून सादर करणार हाेते. यासाठी निधीची तजवीजही शासन केली असावी. पण ज्या भंडारेकरांसाठी हा कार्यक्रम हाेता, त्यांनाच हे माहित नाही. कार्यक्रमाचा प्रचार प्रसार झाला नाही. माध्यमांनाही याची माहिती देण्यात आली नाही. आज २४ राेजी शहरातील सुमनाेहर हाॅल मध्ये कार्यक्रम झाला. प्रेक्षक म्हणून अधिकारी, कर्मचारी आणि काही बचत गटांच्या महिलांचे मुखवटे हाेते. आता प्रशासन या गाेष्टी नाकारेलही पण, सामान्य भंडारेकरांना माहित व्हावे यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, हेही तेवढे सांगावे. ही खंत तर काही कलावंतांनीही बाेलून दाखविली.
ज्यांच्यासाठी कार्यक्रम करावयाचा हाेता, त्यांनाच जर माहित नसेल आणि नियाेजनाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनी कार्यक्रम केल्याचा केवळ कुळाचार करुन माेकळे झाले असतील तर अशा वृत्ती शासनाच्या चांगल्या उपक्रमांचा बट्याबाेळच करतात, हे तेवढेच खरे! शासनाचा निधी येताे, सर्व यंत्रणा हाताशी असतानाही काहींकडून पाट्या टाकण्याचे हाेणारे काम जिल्हा प्रशासनाचे खंबीरपणे आणि तळमळीने नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही खाली पहावयास लावणारे आहे. एक मात्र नक्की काही अधिकाऱ्यांची खानापूर्ती करणारी वृत्ती भंडारेकरांना एका चांगल्या कार्यक्रमापासून मुकविण्यास कारणीभूत ठरली.
चाैकट
असे झाले असल्यास चकीचे: जाधव
कार्यक्रम सर्व भंडारेकरांसाठीच हाेता. कार्यक्रमाची जबाबदारी नगर पालिका प्रशासन अधिकारी चंदन पाटील यांच्याकडे हाेती. पत्रिकाही आधीपासून तयार हाेत्या. मग त्याचा प्रचार प्रसार का झाला नाही, माध्यमांना का निराेप दिले गेले नाही, याची माहिती घेताे. हा प्रकार झाला असल्यास हे चूकीचेच आहे. पूढे काळजी घेतली जाईल, अशी प्रतिक्रीया अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली.