वर्धा
prolonged-dry-spell यावर्षी पावसाने दीर्घ रजा घेतल्याने नद्या कोरड्या असून धरणंही अर्ध्यावरच आहेत. याचा फटका आता जिल्ह्यातील उद्योग आणि शेतीसिंचनासह पिण्याच्या पाण्यावरही दिसून येणार आहे.
महाकाळी येथील धाम प्रकल्पातून अर्ध्या जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, धरणात केवळ ५७.३५ दलघमीच पाणी असल्याने उद्योग आणि शेती सिंचनाला मोठी झळ बसणार आहे. वर्धा शहर, परिसरातील विविध मोठे-मध्यम उद्योग, शहर आणि परिसरातील १४ गावं तसेच धाम नदी काठावरील १० गावांची तहान आणि सिंचनाची व्यवस्था धाम प्रकल्पातून केली जाते. मात्र, यावर्षी पावसाने मोठी रजा घेतली आहे. याचाच परिणाम हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नसल्याने केवळ ५७.३५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या आराखड्यात पिण्यासाठी पाणी सोडण्याला प्राधान्य दिले जाणार असून उद्योग व सिंचनासाठीच्या पाण्याला मोठी कात्री लागण्याचे संकेत आहेत. त्यामुळे याचा परिणाम आगामी काळात उद्योग व रबी हंगामावर दिसून येणार आहे.
२०१९ मध्ये जिल्ह्यात मोठे जलसंकट निर्माण झाले होते. त्यावेळी या प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करून नागरिकांची तहान भागविण्यात आली होती. यावर्षी पुन्हा तशीच परिस्थिती ओढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे उपलब्ध जलसाठ्याचे प्रभावी नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. याच नियोजनात धामच्या जलाशयातून औद्योगिक वापर व सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला कात्री लागणार आहे.
उद्योग ६.४७ तर सिंचनासाठी २८ दलघमी पाणी आरक्षित
धाम प्रकल्पाची एकूण जीवंत पाणी साठवण क्षमता ७७.७२ दलघमी आहे. त्यापैकी ६.४७ दलघमी जलसाठा औद्योगिक वापरासाठी, २८ दलघमी सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी ११.५४ दलघमी पाणीसाठा पूर्वीच नियमानुसार आरक्षित करण्यात आला आहे. मात्र, यंदा हा जलाशय मान्सून काळात पूर्ण क्षमतेने भरला नसल्याने आणि त्यात सध्या केवळ ५७.३५ दलघमी साठा असल्याने सिंचन व औद्योगिक वापरासाठीच्या प्रचलित आरक्षणात कपात करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.