नागपूर
dj ban दहा दिवसांच्या मुक्कामानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. तसेच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागपूर पोलिसांनीही कंबर कसली आहे. डीजेचालकांनी आवाजाची मर्यादा पाळावी, ती ओलांडल्यास त्यांच्यासह आयोजकांवरही कारवाई करण्यात येईल. नियमांचा भंग केल्यास पोलिस कडक कारवाई करतील, अशी आक्रमक भूमिका पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली आहे.
पोलिस आयुक्त नांगरे पाटील म्हणाले की, विर्जनाच्या दिवशी ६ हजारांवर पोलिस अधिकारी-अंमलदार, होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथके, जलद प्रतिसाद पथके आणि बॉम्ब शोधक-नाशक पथकांच्या माध्यमातून शहरावर करडी नजर ठेवली जाणार आहे.विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची १ कंपनी, ४ दंगल नियंत्रण पथके आणि ४ जलद प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. संशयास्पद वस्तू अथवा स्फोटकांचा धोका लक्षात घेता ३ बॉम्ब शोधक व नाशक पथकेही तैनात करण्यात आली आहेत. गर्दीमध्ये साध्या वेशातील पोलिसही तैनात राहणार असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
सीसीटीव्हीची नजर कैद
विसर्जनाच्या दिवशी शहर अक्षरश: पोलिसांच्या नजरेखाली राहणार आहे. शहरातील तब्बल २ हजार ८५८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, विसर्जन मार्ग आणि संवेदनशील भागांवर लक्ष ठेवले जाणार आहे. यासोबतच ५ मोबाइल सर्व्हेलन्स व्हॅन आणि ड्रोन उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून गर्दीची स्थिती, मिरवणुकीची हालचाल आणि संभाव्य संवेदनशील ठिकाणांवर हवाई नजर ठेवली जाणार आहे. विसर्जनाच्या दिवशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी अग्निशमन दलाचीही जय्यत तयारी करण्यात आली आहे. १२ फायर स्टेशन, ३१ अग्निशमन वाहने आणि १३ आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
जड वाहनांना प्रवेशबंदी
वाहतूक कोंडी होऊ नये किंवा सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून वाहतूक पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी नियोजन केले आहे.२५ आणि २६ सप्टेंबरला रात्री ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत काही मार्गांवर जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने आग्याराम देवी चौक ते गणेश मंदिर कटिंग, मॉडेल मिल चौक ते मौलाना नातिक चौक, टिळक पुतळा चौक ते गणेश मंदिर कटिंग या मार्गांचा समावेश आहे. मॉडेल मिल चौकातील वाहतूक रामकुलर आणि जाधव चौकाच्या दिशेने, तर आग्याराम देवी चौकातील वाहतूक जाधव चौक व रमन सायन्स पार्कच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. तसेच मौलाना नातिक चौक आणि टिळक पुतळा चौकातील वाहतूक रमन सायन्सच्या दिशेने वळवण्यात येणार आहे.