खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता!

आयात शुल्कात मोठी कपात

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Edible oil priceखाद्यतेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. सोयाबीन, पाम आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय गुरुवार, २४ सप्टेंबरपासून लागू झाला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर, इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशन या उद्योग संघटनेने किरकोळ खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची आशा व्यक्त केली आहे.

oil 
 
भारत आपल्या एकूण खाद्यतेलाच्या गरजेपैकी सुमारे ६० टक्के गरज आयातीद्वारे भागवतो. सरकारने बुधवारी कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क १० टक्क्यांवरून शून्यावर आणले. शुद्ध केलेल्या सूर्यफूल तेलावरील बीसीडी ३२.५ टक्क्यांवरून २२.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. कच्च्या सोयाबीन तेल आणि पाम तेलावरील बीसीडी १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत, तर शुद्ध केलेल्या सोयाबीन तेल आणि पाम तेलावरील बीसीडी ३२.५ टक्क्यांवरून २७.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.
 
आयव्हीपीएचे अध्यक्ष सुधाकर देसाई म्हणाले की, काही खाद्यतेलांच्या आयातीवरील सीमा शुल्क कमी करण्याचा निर्णय सणासुदीचा काळ जवळ येत असताना अत्यंत महत्त्वाच्या वेळी घेण्यात आला आहे. "कमी आयात शुल्कामुळे आयात केलेल्या खाद्यतेलाची किंमत कमी होईल, ज्यामुळे ग्राहकोपयोगी किमतींमध्ये काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकते," असे ते म्हणाले. देसाई म्हणाले की, आगामी सणासुदीच्या महिन्यांमध्ये देशभरात पुरेसा पुरवठा कायम राखणे हे खाद्यतेल उद्योगाचे तात्काळ प्राधान्य आहे.