जमशेदपूरमध्ये मंत्री दीपिका पांडे सिंह यांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
जमशेदपूर.
Four killed in accident in Jamshedpur झारखंडमधील जमशेदपूर येथे गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सोनारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मरीन ड्राईव्हवर हा अपघात घडला. मृतांमध्ये झारखंड सरकारच्या मंत्री दीपिका पांडे सिंह यांची मुलगी त्रिशा सिंह हिचाही समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे १० वाजल्यापासून एक ट्रक रस्त्यावर बंद अवस्थेत उभा होता. गुरुवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेली कार या ट्रकच्या मागील बाजूला जाऊन आदळली. धडक एवढी जोरदार होती की कार ट्रेलरमध्ये अडकली आणि तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील चारही जणांचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला.
 
 

amshedpur 
 
अपघाताची माहिती मिळताच डीएसपी सीसीआर मनोज ठाकूर, सोनारी पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय सुमन यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले. गाडीचा पत्रा कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. त्यानंतर चारही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी एमजीएम मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आले.पोलिसांनी मृतांची ओळख सार्थक अग्रवाल, नमन गुप्ता, वंशिका खंडेलवाल आणि त्रिशा सिंग अशी केली आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मृतदेहही गंभीररीत्या छिन्नविछिन्न झाले होते.
 
उपविभागीय अधिकारी अर्णव मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक बुधवारी रात्री १० वाजल्यापासून बंद पडलेल्या अवस्थेत रस्त्यावर उभा होता. त्यानंतर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने ट्रेलरला मागून धडक दिली. या दुर्घटनेनंतर ट्रकच्या मागील बाजूस आवश्यक सुरक्षा चिन्हे किंवा चेतावणीची व्यवस्था होती का, याचीही चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात कारचा वेग आणि पहाटेच्या अंधारामुळे उभा असलेला ट्रक न दिसणे ही संभाव्य कारणे मानली जात आहेत.या दुर्घटनेने जमशेदपूर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून अपघाताच्या सर्व बाजूंचा तपास सुरू असून नेमक्या परिस्थितीचा शोध घेतला जात आहे. यापूर्वी झारखंडची राजधानी रांची येथेही भीषण दुर्घटना घडली होती. त्यावेळी कोसळलेल्या पाण्याच्या टाकीखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला होता.