‘एक कॉलेज एक गणपती’चे थाटात विसर्जन

मेघेंपाठाेपाठ अग्निहोत्रींचा पुढाकार

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
वर्धा
ganpati immersion जिल्ह्यातील पुलगाव येथील कॉटन जीनमध्ये बसणारा गणपती त्यानंतर सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे यांचा गणपती प्रसिद्ध होता. पुलगाव येथील गणपती बसणेच बंद झाले. मेघे रुग्णालयातही गणेशोत्सव यावर्षी चर्चेत नव्हता. परंतु, जय महाकाली शिक्षण संस्थेत ‘एक कॉलेज एक गणपती’ हा नव्याने पायंडा पाडण्यात आला. बुधवारी सायंकाळी धडाक्यात विद्यार्थ्यांच्या मनमुराद आनंदात गणेशाला निरोप देण्यात आला.

ganapati visarjan
३० वर्षांपासून सावंगी येथील गणेशोत्सव वर्धेकरांनी अनुभवला. यावर्षी त्या संस्थेतर्फे गणेशोत्सवाला नेहमीसारखे जाहीर रूप देण्यात आले नाही. दरम्यान, अनेक वर्षांपासून जय महाकाली शिक्षण संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विविध महाविद्यालयांत गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता. यावर्षी उत्सवाचे २५ व्या वर्षाचे औचित्य साधून सर्व महाविद्यालयांतील गणेशोत्सव बंद करून एकाच ठिकाणी गणपतीची स्थापना करण्यात आली. यावर्षी प्रथमच संस्थेच्या वतीने शहरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांना महाआरतीकरिता निमंत्रित करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवादरम्यान पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी गणेश महात्म्य विद्यार्थ्यांना अवगत केले. पर्यावरणपूरक गणेशावर विशेष भर देण्यात आला.
बुधवारी सायंकाळी विघ्नराजेंद्र गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावर ढोल-ताशांच्या निनादात पुढे पुढे जाणाऱ्या मिरवणुकीत सांस्कृतिक कार्यक्रमांचाही सहभाग होता. गुलालाची उधळण करीत मिरवणूक शिवाजी चौकापर्यंत पोहोचली. त्या ठिकाणी नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटल्यानंतर पवनार येथे कुंडात गणेशाचे विसर्जन करण्यात आले. पुढील वर्षी गणेशोत्सवाचे आयोजन अजून मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी व्यक्त केला.
शोभायात्रेत संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री यांच्यासह प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.