मुंबई
anurag kashyap मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा ‘गोंधळ’ चित्रपट 2027 च्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत एण्ट्री ठरल्यानंतर या निवडीची चर्चा सुरू झाली आहे. भारताच्या ऑस्कर निवड प्रक्रियेवर प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे या चर्चेला आणखी उधाण आले. ‘गोंधळ’ने आधी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली उपस्थिती निर्माण करण्यावर भर द्यावा, असे मत कश्यप यांनी व्यक्त केले होते. त्यावर आता चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
डावखर यांनी अनुराग कश्यप यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करत त्यांच्यासोबत झालेल्या एका भेटीचा संदर्भ दिला. 26 एप्रिल रोजी बंगळुरू-मुंबई विमान प्रवासादरम्यान त्यांची कश्यप यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांनी कश्यप यांना ‘गोंधळ’ या चित्रपटाबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी कश्यप यांनी आपण हा चित्रपट पाहिलेला नसल्याचे तसेच त्याच्याबद्दल ऐकलेही नसल्याचे सांगितले होते. मात्र, चित्रपट नक्की पाहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे डावखर यांनी नमूद केले.
डावखर यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर ‘गोंधळ’ मुंबईत सार्वजनिकरित्या प्रदर्शित किंवा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे चित्रपट प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याच्या ऑस्कर निवडीबाबत मत बनवू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. “चित्रपट पाहण्यापूर्वी त्याच्यावर निर्णय देऊ नका,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
‘गोंधळ’ हा फिल्म इंडस्ट्रीच्या पारंपरिक पार्श्वभूमीबाहेरून आलेल्या पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा चित्रपट असल्याचे डावखर यांनी सांगितले. मराठी संस्कृती आणि जागतिक प्रेक्षक यांना जोडणारा सायकोलॉजिकल थ्रिलर अशी त्यांनी चित्रपटाची मांडणी केली आहे. हा चित्रपट ओटीटीसाठी नव्हे, तर मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तयार करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आपल्याला पूर्णपणे जाणवत असून, देशाला निराश न करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनुराग कश्यप यांनी यापूर्वी भारताच्या ऑस्कर निवड प्रक्रियेवर भाष्य केले होते. त्यांच्या मते, भारताने काही चांगल्या संधी गमावल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी ‘द लंचबॉक्स’ आणि ‘ऑल वी इमॅजिन एज लाइट’ या चित्रपटांचा उल्लेख केला होता. ऑस्करसाठी निवडल्या जाणाऱ्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर आधीच प्रदर्शनाची संधी आणि प्रेक्षकांची ओळख मिळणे महत्त्वाचे ठरू शकते, असे कश्यप यांनी म्हटले होते. ‘गोंधळ’बाबत बोलताना त्यांनी हा चित्रपट अद्याप पाहिलेला नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यामुळे चित्रपटाने आधी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून आपली पोहोच वाढवण्याचा प्रयत्न करावा, अशी त्यांची भूमिका होती.
‘गोंधळ’ची 2027 च्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत एण्ट्री म्हणून निवड फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली आहे. 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली. महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘गोंधळ’ या लोककला आणि धार्मिक विधीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. यापूर्वी चित्रपटाने फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये दिग्दर्शनासाठी सिल्व्हर पीकॉक पुरस्कारही मिळवला आहे.
‘गोंधळ’च्या ऑस्करवारीच्या पार्श्वभूमीवर आता चित्रपटाच्या निवडीइतकीच त्याबाबत सुरू झालेली चर्चा महत्त्वाची ठरली आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाची पोहोच वाढवण्याच्या गरजेवर प्रश्न उपस्थित होत असताना, दुसरीकडे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी चित्रपट प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच त्याचे मूल्यमापन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आगामी काळात ‘गोंधळ’ची आंतरराष्ट्रीय वाटचाल आणि ऑस्करच्या पुढील प्रक्रियेकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष राहणार आहे.