अनिल कांबळे
नागपूर,
illegal hookah parlour शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य हुक्का ग्राहकांना पुरवणाऱ्या अनधिकृत हुक्का पार्लरवर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांनी हुक्का पार्लरचा मालक आणि मॅनेजर अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या ताब्यातून हुक्का पॉट, विविध फ्लेवर्सचे तंबाखू तसेच इतर साहित्य असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बुधवारी पहाटे ३ वाजता सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. कॅफे हाऊस चौक, धरमपेठ येथील डी-मार्टीन लाऊंज रूफटॉप रेस्टॉरंट व कॅफे येथे पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणी ग्राहकांना शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य हुक्का पदार्थांचे सेवन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले. पोलिसांच्या चौकशीत संबंधित हुक्का पार्लर विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चालविला जात असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी हुक्का पार्लरचा मालक रितीक राजेंद्र भावसार (३४), रा. प्लॉट क्रमांक ४३८, आनंदी अपार्टमेंट, वैशाली नगर, पाचपावली, नागपूर तसेच मॅनेजर नितेश धर्मेंद्र पटेल (२७), रा. गवळीपुरा, धरमपेठ, नागपूर यांना आरोपी केले आहे. पोलिसांनी हुक्का पार्लरसाठी वापरण्यात येणारे हुक्का पॉट, विविध फ्लेवर्सचे तंबाखू आणि इतर साहित्य असा १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शासनाच्या बंदीचे उल्लंघन करून हुक्का सेवा सुरू ठेवण्यात आल्याने दोन्ही आरोपींविरुद्ध सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मधील कलम ४(अ), ९, १२ तसेच महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०१८ अन्वये सिताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना मुद्देमालासह सिताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.