वर्धा,
datta-meghe-deemed-university दत्ता मेघे यांनी दूरदृष्टीतून सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे यांनी उच्च शिक्षण व संशोधन संस्था, (अभिमत विद्यापीठ) या नामांकित शैक्षणिक व वैद्यकीय साम्राज्याची स्थापना केली होती. विदर्भातील तसेच देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था म्हणून या विद्यापीठाने ओळख निर्माण केली होती. गेल्या काही महिन्यांपासुन विद्यापीठ व रुग्णालयाचे मालक अदानी समुह असल्याची कुजबुज होती. अखेर, काल त्या चर्चांना पुर्णविराम मिळाला. या संस्थेच्या कारभाराच्या चाव्या अदानी समूहाकडे गेल्याने आता ’दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था’ या ऐतिहासिक नावात बदल करून आता ’अदानी उच्च शिक्षण व संशोधन संस्था’ असे नवे नामकरण करण्यात आले असल्याचे समाज माध्यमांवरून झळकले आहे. अदानी असे नामकरण करण्यासाठी काही अटी व शर्थी ठेवण्यात आल्या होत्या. त्या पुर्ण करून दिल्यानंतरच अदानी हे नाव सावंगी परिसरात झळकू लागले आहे.

गेल्या काही काळापासून अदानी समूहाची सामाजिक शाखा असलेल्या अदानी फाउंडेशन आणि मेघे समूह यांच्यात मोठ्या कराराच्या वाटाघाटी सुरू होत्या. आरोग्य आणि प्रगत शिक्षण क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यासाठी दोन्ही समूहांमध्ये सामंजस्य करार झाला होता. मात्र, सुरुवातीला केवळ सामाजिक भागीदारी किंवा तांत्रिक सहकार्य असल्याचे भासवले गेले असले तरी आता थेट संस्थेचे नावच बदलण्यात आल्याने हे संपूर्ण शैक्षणिक परिसरच अदानी समूहाच्या नियंत्रणाखाली गेल्याचे स्पष्ट होत आहे.
या अधिकृत घोषणेपूर्वीच विद्यापीठाच्या अंतर्गत प्रशासकीय वर्तुळात सर्व अंतर्गत कामकाज, कागदपत्रे आणि डिजिटल दळणवळण या नव्या नावाने सुरू झाल्याची माहिती अंतर्गत गोटातून मिळाली आहे. सावंगी (मेघे) येथील हे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय वध्र्यासह संपूर्ण विदर्भातील गोरगरीब जनतेसाठी हक्काचा आधार मानले जाते. मेघे परिवाराचे निेयंत्रण होते तोपर्यंत हे रुग्णालय वर्धेकरांना आपलेचे वाटत होते. आता त्यात कार्पोरेटने प्रवेश केल्यानंतर ते पुन्हा वर्धेकरांना आपलेचे वाटावे यासाठी नव्या व्यवस्थापनाला परिश्रम घ्यावे लागणार आहेत.