वेस्ट इंडिजविरुद्ध कोहली-रोहितची ‘विक्रमवारी’!

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
kohli-and-rohit भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेसाठी सज्ज असून, अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष लागले आहे. दोन्ही खेळाडूंना या मालिकेत मोठ्या वैयक्तिक विक्रमांच्या जवळ जाण्याची संधी मिळणार आहे.
 
kohli-and-rohit
 
विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी आता केवळ ५९ धावांची गरज आहे. कोहलीने आतापर्यंत ३१४ एकदिवसीय सामने खेळताना १४,९४१ धावा केल्या आहेत. १५ हजार धावा पूर्ण केल्यास अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरेल. या यादीत सचिन तेंडुलकर १८,४२६ धावांसह अव्वल स्थानावर आहे. तेंडुलकरने ही कामगिरी ४६३ एकदिवसीय सामन्यांत केली आहे.
 
दुसरीकडे, रोहित शर्माही एका महत्त्वाच्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. रोहितने २८८ एकदिवसीय सामन्यांत ११,८९५ धावा केल्या असून १२ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आणखी १०५ धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत केवळ सहा फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहितने हा टप्पा गाठल्यास तो अशी कामगिरी करणारा सातवा फलंदाज ठरेल.
 
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेत तीन सामने होणार असल्याने कोहली आणि रोहित यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. दोघांनी पहिल्याच सामन्यात हे विक्रम गाठले, तर त्याला विशेष महत्त्व प्राप्त होईल. त्यानंतर मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्येही त्यांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष राहणार आहे. दोन्ही खेळाडू आता केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत असल्याने त्यांच्या प्रत्येक सामन्याबद्दलची उत्सुकता कायम असून, वेस्ट इंडिजविरुद्धची आगामी मालिका त्याला अपवाद ठरणार नाही.