दुष्काळाच्या चर्चेत गुलाबजामून, उपमा अन् साबुदाणा खिचडी

लातूर जिल्हा परिषदेतील ‘नाश्ता’ चर्चेत

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
लातूर
latur drought meeting लातूर मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळाच्या चर्चेदरम्यान अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना गुलाबजामून, उपमा, साबुदाणा खिचडी आणि चहा असा नाश्ता देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 

दुष्काळाच्या चर्चेत गुलाबजामून, उपमा अन् साबुदाणा खिचडी 
नांदेडमधील दुष्काळ आढावा बैठकीत नेते आणि अधिकाऱ्यांसमोर काजू-बदाम ठेवण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या घटनेवरून राजकीय आणि सामाजिक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच लातूर जिल्हा परिषदेच्या वातानुकूलित सभागृहातील नाश्त्याचा प्रकार चर्चेत आला आहे.
पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यालाही त्याचा मोठा फटका बसला असून यंदा जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोयाबीन, उडीद आणि ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकटामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट होत चालली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूर जिल्हा दुष्काळ पाहणी दौऱ्यापूर्वी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता आणि नागरिकांच्या पाणीटंचाईवर चर्चा सुरू असताना उपस्थित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी विविध खाद्यपदार्थांचा नाश्ता देण्यात आला.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या latur drought meeting शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना सभागृहात गुलाबजामूनसह विविध पदार्थांचा नाश्ता का देण्यात आला, तसेच तो देण्याचा निर्णय नेमका कोणाच्या सूचनेनुसार घेण्यात आला, असा सवाल आता समाजमाध्यमांवर उपस्थित केला जात आहे. दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि शेतकरी अडचणीत असताना अशा प्रकारच्या खर्चाची गरज होती का, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, नाश्ता देण्यामागील प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे हा नाश्ता नेमका कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या नियमानुसार देण्यात आला, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण मिळते का, याकडे आता लक्ष लागले आहे.