मुंबई,
maharashtra medical admission महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या राज्य कोट्यांतर्गत एमबीबीएस आणि बीडीएस पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी नुकतीच पूर्ण झाली. या फेरीत दोन्ही अभ्यासक्रमांच्या एकूण ११ हजार १९६ उपलब्ध जागांपैकी ९ हजार २६५ (८२.७५ टक्के) जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून १,९३१ जागा रिक्त राहिल्या आहेत.
एमबीबीएस अभ्यासक्रमात नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओघ पाहायला मिळाला. राज्यातील ६७ वैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठांतील ८,५७९ जागांपैकी ७,६३० (८८.९३ टक्के) जागांवर प्रवेश झाले असून ९४९ जागा रिक्त आहेत. यामध्ये ४२ शासकीय महाविद्यालयांतील ४,९८० जागांपैकी सर्वाधिक ४, ८२५ (९६.८८ टक्के) जागा भरल्या गेल्या असून केवळ १५५ जागा शिल्लक आहेत. तसेच २३ खासगी महाविद्यालयांतील ३,१४९ पैकी २,६२५ जागा भरल्या असून ५२४ जागा रिक्त आहेत, तर २ खासगी विद्यापीठांतील ४५०,१८० जागांवर प्रवेश झाले असून २७० जागा शिल्लक आहेत.
दुसरीकडे बीडीएस अभ्यासक्रमात एकूण ६२.४७ टक्के प्रवेश झाले आहेत. राज्यातील २९ महाविद्यालये व विद्यापीठांतील २,६१७ जागांपैकी १,६३५ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून ९८२ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये ५ शासकीय महाविद्यालयांतील ३१७ पैकी २५४ जागा भरल्या असून ६३ जागा रिक्त आहेत. २३ खासगी महाविद्यालयांतील २,२०० पैकी १,३४६ जागांवर प्रवेश झाले असून ८५४ जागा रिक्त आहेत, तर एका खासगी विद्यापीठातील १०० पैकी ३५ जागा भरल्या असून ६५ जागा रिक्त राहिल्या आहेत.
तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक
नोंदणीची मुदत: २६ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत)
कागदपत्रे अपलोड करणे: २६ सप्टेंबर २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत मूळ कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती)
जागांचे वर्गीकरण (सीट मॅट्रिक्स): ६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार
प्राधान्यक्रम (चॉईस फिलिंग): ७ ऑक्टोबर २०२६ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान
निवड यादी जाहीर: ११ ऑक्टोबर २०२६ रोजी फेरी ३ ची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.