परतीचा पाऊस इशारा देऊन जाणार 'यलो अलर्ट'

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
मुंबई
heavy rain warning महाराष्ट्रात काही दिवसांपासून ओसरलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून परतीच्या पावसाने राज्याच्या अनेक भागांत जोर धरला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजही आहे.
 

heavy rain warning  
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणातील नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात सायंकाळच्या सुमारास ढगफुटीसदृश जोरदार पावसाने हजेरी लावली. अल्पावधीतच पावसाचा जोर वाढल्याने परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता कायम आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नाशिककरांना पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यासाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील काही heavy rain warning  भागांमध्ये परतीचा पाऊस सक्रिय झाला असला तरी बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. जिल्ह्यात तब्बल ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. शेतातील सोयाबीन, तूर, कपाशी आणि मका या पिकांना पुरेसा पाऊस न मिळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून कुटुंबाच्या खर्चाचे बजेटही कोलमडले आहे.
शेतीशिवाय उत्पन्नाचे अन्य साधन नसलेल्या शेतकरी कुटुंबांना पावसाच्या लहरीपणाचा थेट फटका बसत आहे. राज्यातील एका बाजूला परतीच्या पावसाचा जोर वाढत असताना दुसरीकडे बुलढाण्यासारख्या भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने हवामानातील या विरोधाभासी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.