आर्वी नपला व्यापारी संकुलासाठी ६२४०.३० चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य

आ. सुमीत वानखेडे यांच्या पाठपुराव्याला यश

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
आर्वी,
mla sumeet wankhede येथे व्यापारी संकुल उभारण्यासाठी शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार सुमीत वानखेडे यांनी केली होती. त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर ६२४०.३० चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास मंजुरी दिली आहे. मौजा आर्वी येथील नझुल शीट क्र. ४, भूखंड क्र. ३/६/१ मधील ६२४०.३० वर्ग मीटर एवढी जमीन आर्वी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना ’व्यापारी संकुल बांधकाम’ या प्रयोजनासाठी विनामूल्य प्रदान करण्यात आली आहे. ही जमीन नगर परिषदेला ’भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने धारण करावी लागेल. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी बांधकामास सुरुवात करणे बंधनकारक असून, नियमानुसार परवानग्या आणि विकास नियंत्रण नियमावलीचे पालन करावे लागणार आहे.

mla sumeet wankhede 
 
शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय ही जमीन किंवा तिचा कोणताही भाग विक्री, दान, गहाण, भाडेपट्ट्याने देणे अथवा खाजगी-सार्वजनिक सहभाग तत्त्वावर हस्तांतरित करता येणार नाही तसेच कोणताही आर्थिक व्यवहार किंवा पोटविभाजन करता येणार नाही. याशिवाय, मंजूर प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी जमिनीचा वापर करण्यास मनाई असून, प्रस्तावित विकासकामामुळे लगतच्या खातेदारांच्या वहिवाटीस कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता नगर परिषदेला घ्यावी लागणार आहे.
आर्वी शहरातील नागरिकांना सुसज्ज आणि आधुनिक व्यापारी संकुलाची सुविधा उपलब्ध व्हावी तसेच नगर परिषदेच्या उत्पन्नात शाश्वत वाढ व्हावी, या हेतूनेच जमीन विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महसुल मंत्री बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
आर्वीचा विकास हाच ध्यास : वानखेडे
आर्वी ही माझी जन्माभुमी आहे. या मतदार संघाचा विकास करण्याचा शब्द आपण निवडणुकीत दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव बर्याचदा कामात येतो. आपण आर्वीला व्यापारी संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. आर्वी मतदार संघात शासनाच्या सोयीसुविधान आणि योजना कशा आणता येतील हाच आपला ध्यास असल्याची प्रतिक्रिया आ. सुमीत वानखेडे यांनी दिली.