नवी दिल्ली,
Modi's appeal to the youth power पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वडनगर ते वाराणसी प्रवास करणाऱ्या तरुणांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी सेवा, राष्ट्रनिर्माण आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर तरुणांशी संवाद साधत २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवाशक्तीची भूमिका निर्णायक असल्याचे सांगितले.सेवा ही केवळ सांगण्याची गोष्ट नसून ती प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचली पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. राजकारणात कितीही मोठे स्थान मिळाले तरी सेवेचा मार्ग सोडता कामा नये, असे सांगत त्यांनी आपल्या आचरणातूनच समाजाला सेवेचा संदेश मिळायला हवा, असे नमूद केले. ‘सेवा हाच सर्वोच्च धर्म आहे’, या भावनेतून पुढे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वडनगर आणि वाराणसी या दोन्ही शहरांचा उल्लेख करताना मोदी यांनी या शहरांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. हजारो वर्षांपासून ही दोन्ही शहरे चैतन्यमय असल्याचे त्यांनी सांगितले. वडनगर हे आपले जन्मस्थान, तर वाराणसी हे आपले कार्यस्थळ असल्याचे त्यांनी नमूद केले. काशीला बाबा विश्वनाथांचा आशीर्वाद असून वडनगरला हाटकेश्वर महादेवांचा आशीर्वाद लाभल्याचेही त्यांनी सांगितले.वडनगरहून वाराणसीकडे निघालेल्या पथकाकडून मिळालेल्या अनुभवांचाही मोदी यांनी उल्लेख केला. या प्रवासादरम्यान सुरू असलेल्या सेवा उपक्रमांमुळे आपणही त्यांच्यासोबत प्रवास करत असल्याची भावना होत असल्याचे त्यांनी सांगितले. गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळणे आणि आयुष्मान योजनेसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी ही सेवेच्या भावनेतूनच शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
तरुणांना राष्ट्रनिर्माणाच्या व्यापक भूमिकेची जाणीव करून देताना मोदी यांनी राजकारण, निवडणुका आणि शासनव्यवस्था यांना त्यांचे स्वतंत्र स्थान असल्याचे सांगितले. मात्र देशाला विकसित करण्याचा संकल्प घेऊन काम करणाऱ्यांसाठी राष्ट्रनिर्माण हा केंद्रस्थानी असला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी युवाशक्तीला या प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.आजची तरुण पिढी विकसित भारताची निर्मिती करणारी शक्ती तर आहेच, त्याचबरोबर भविष्यातील विकसित भारताची प्रमुख लाभार्थीही असेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. देश समजून घेण्यासाठी केवळ पुस्तकी माहिती पुरेशी नसून प्रत्यक्ष भारताचा अनुभव घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध प्रदेशांमध्ये जाऊन तेथील नागरिकांना भेटणे, त्यांच्या समस्या आणि स्वप्ने समजून घेणे, वेगवेगळ्या सामाजिक घटकांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि त्यांचे विचार ऐकणे या बाबींना त्यांनी महत्त्व दिले. ‘सेवा संकल्प यात्रा’ या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. दरम्यान, यापूर्वी हवामान संकटासंदर्भातील एका महत्त्वपूर्ण निवेदनात मोदी यांनी भारत जगाला एक नवा मार्ग दाखवत असल्याचे म्हटले होते.