शिक्षक मारहाण प्रकरणात रितू तावडे यांच्यासह आरोपींना दंड

वारंवार गैरहजेरीची न्यायालयाकडून दखल

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
मुंबई
Ritu Tawde २०१६ मध्ये वाकोला परिसरातील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील एका शिक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात मुंबईच्या सत्र न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या खटल्याच्या सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्याने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह काही आरोपींना प्रत्येकी ३०० रुपयांचा आर्थिक दंड भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, वैयक्तिक उपस्थितीतून सूट मिळावी यासाठी आरोपींकडून दाखल करण्यात आलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. मात्र, सूट देताना दंडाची रक्कम भरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
 

Mumbai Mayor Ritu Tawde Fined ₹300 for Repeated Absence in 2016 Teacher Assault Case 
वाकोला परिसरातील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून रितू तावडे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण आठ आरोपींविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मागील सुनावणीच्या वेळी तावडे न्यायालयात उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यानंतर न्यायालयाने त्यांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट देताना ही शेवटची संधी असल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र, त्यानंतर झालेल्या सुनावणीलाही तावडे यांच्यासह काही आरोपी गैरहजर राहिले. त्यामुळे वैयक्तिक उपस्थितीतून पुन्हा सूट मिळावी, यासाठी आरोपींकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला. आरोपींच्या वारंवार गैरहजेरीची तसेच वैयक्तिक उपस्थितीतून सूट मिळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या अर्जांची न्यायालयाने दखल घेतली.न्यायालयाने नव्याने दाखल करण्यात आलेला उपस्थितीतून सूट देण्याचा अर्ज मंजूर केला असला, तरी रितू तावडे यांच्यासह संबंधित आरोपींना प्रत्येकी ३०० रुपयांचा दंड भरण्याचे निर्देश दिले. त्यामुळे वैयक्तिक उपस्थितीबाबत दिलासा मिळाला असला, तरी न्यायालयाने गैरहजेरीची नोंद घेत आर्थिक दंड ठोठावला आहे.या प्रकरणातील आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आगामी सुनावण्यांमध्ये आरोपींची उपस्थिती तसेच साक्षीदारांच्या जबाबांकडे लक्ष लागले आहे.