चिटणीस पार्कमध्ये १२ श्रीगणेश मूर्ती स्वीकार केंद्राचे लोकार्पण

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
नागपूर,
nagapur ganapati visarjan 2026पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देत गणेशभक्तांना श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी सुलभ व सुविधाजनक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य नागपूरचे आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून चिटणीस पार्क येथे १२ गणेश मूर्ती स्वीकार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांचे विधिवत पूजन करून मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते बुधवार रोजी लोकार्पण करण्यात आले.
 

mmmm 
यावेळी गांधीबाग झोन सभापती श्रीमती उमा देशमुख, नगरसेवक श्री. सुधीर राऊत, नगरसेवक श्री. सचिन नाईक, नगरसेवक श्री. संजय बालपांडे, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापूरकर, नगरसेविका श्रीमती विद्या कन्हेरे, नगरसेविका श्रीमती प्रमिला गौर, ग्रीन व्हिजीलचे संस्थापक श्री. कौत्सुव चॅटर्जी, कु. सुरभी जैस्वाल, पर्यावरण तज्ज्ञ श्री. स्वानंद सोनी तसेच मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी श्रीगणरायांचे पूजन करून सर्व नागरिकांना सुख, व समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना केली. गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक पद्धतीने श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करावे तसेच मनपाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे यावर्षी शहरातील दहाही झोनमध्ये विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन कुंडाची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मनपाच्या माध्यमातून क्युआर कोड व संकेतस्थळावर झोननिहाय कृत्रिम विसर्जन कुंडांची माहिती, ठिकाणे व दिशादर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांनी क्युआर कोड किंवा संकेतस्थळाचा उपयोग करून आपल्या जवळच्या कृत्रिम विसर्जन कुंडात श्रीगणेश मूर्तीचे पर्यावरणपूरक व श्रद्धापूर्वक विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले.
चिटणीस पार्क येथे स्व.प्रभाकरराव दटके यांच्या स्मृतीनिमित्त आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या पुढाकारातून १२ विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व कुंडांना प्रमुख नद्यांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये ८ कुंड २० फूट लांब व १२ फूट रुंद, ५ कुंड १५ फूट लांब व ९ फूट रुंद, तर २ कुंड १२ फूट लांब व ८ फूट रुंद आहेत.
गणेशभक्तांना विसर्जनाच्या वेळी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी विविध आकारांची १२ कुंडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच विसर्जनाच्या वेळी भक्तिगीते वाजविण्यात येणार असून, परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळीही गणेशभक्तांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी विद्युत व्यवस्था व रोषणाई करण्यात आली आहे.
या विसर्जन कुंडांची रचना स्वस्तिकाच्या आकारात करण्यात आली असून, विसर्जनानंतर निर्माल्याचे स्वतंत्रपणे संकलन व्हावे यासाठी प्रत्येक ठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली आहे. चिटणीस पार्कच्या सर्व प्रवेशद्वारांतून गणेशभक्तांना मूर्ती घेऊन येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे संचालन महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या श्रीमती उज्वला चरडे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा महानगरपालिकेच्या वतीने मानाचा दुपट्टा व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
गणेश मूर्ती स्वीकार केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये :
१. चिटणीस पार्कच्या सर्व प्रवेशद्वारांतून गणेशभक्तांना मूर्ती आणता येणार.
२. विविध आकारांची १२ विसर्जन कुंडे उपलब्ध असल्याने प्रतीक्षा वेळ कमी होणार.
३. विसर्जनाच्या वेळी भक्तिगीते वाजविण्यात येणार असल्याने भक्तीमय वातावरणाची निर्मिती.
४. रात्रीच्या वेळीही पुरेशी रोषणाई व विद्युत व्यवस्था.
५. स्वस्तिकाच्या आकारातील विसर्जन कुंडांची आकर्षक रचना.
६. निर्माल्य संकलनासाठी विसर्जनस्थळी स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था.