नागपूर,
nagpur-gis-infrastructure-planningनागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरात होणाऱ्या विकासकामांना सुनियोजित करण्याच्या उद्देशाने तसेच नागरिकांपर्यंत अस्तित्वातील पायाभूत सुविधांची माहिती मिळावी या उद्देशाने मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेत गुरुवार रोजी मनपा मुख्यालयात बैठक पार पडली. शहरातील विकासकामे आणि बांधकामावेळी येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी मनपाद्वारे जीआयएस प्रणालीचा वापर करून पायाभूत सुविधांचे योग्य नियोजन करण्यासंदर्भात आयुक्त डॉ. विपीन यांच्याद्वारे निर्देश देण्यात आले.
बैठकीत प्रभारी उपसंचालक श्री. ऋतुराज जाधव, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, प्रकल्प अभियंता श्री. राजीव गौतम, क्रेडआय नागपूरचे प्रतिनिधी तसेच मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून प्रस्तावित बांधकामासाठी परवानगी प्रक्रिया अधिक सुसूत्र करण्यासोबतच शहरातील अस्तित्वात असलेल्या बांधकामे व पायाभूत सुविधांचे नकाशीकरण करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील आवश्यक पायाभूत सुविधांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा मनपाचा मानस आहे.
भविष्यातील नागरी गरजांच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांचा अभ्यास करून विकासकामे सुनियोजित पद्धतीने राबविणे, तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधून बांधकामांदरम्यान येणाऱ्या अडचणी कमी करणे यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
शहरातील अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना शहरातील उपलब्ध सुविधांची माहिती सहजपणे मिळावी, तसेच विकासकामांच्या नियोजनात पारदर्शकता व सुसूत्रता निर्माण व्हावी, यासाठी कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देश दिले.