अनिल कांबळे
नागपूर,
investment scam जास्त परताव्याचे आमिष दाखवत बनावट गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्यास भाग पाडून मनीषनगरातील ५५ वर्षीय जाहिरात व्यावसायिकाची सायबर गुन्हेगारांनी तब्बल २५ लाख ७९ हजार २७६ रुपयांनी फसवणूक केली. व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून गुन्हेगारांनी त्यांना बनावट गुंतवणूक योजना आणि खोट्या परताव्याचे आमिष दाखवले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी सुनील पंढरीनाथ करंगळे (५५), रा. मनीषनगर, यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ८ जुलै ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. २२ सप्टेंबर रोजी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुनील करंगळे यांच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी व्यक्तींनी विविध मोबाइल क्रमांकांवरून आर्थिक गुंतवणुकीच्या जाहिराती पाठवल्या. कमी कालावधीत मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे सांगून त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी काही लिंक पाठवून त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे पैसे वर्ग करण्यास सांगितले. याचदरम्यान आरोपींनी करंगळे यांना ‘व्हिआयपी’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले. त्यानंतर एक ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. या ॲपमध्ये त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम आणि त्यावर मिळणारा कथित परतावा दाखवण्यात येत होता. प्रत्यक्षात ही सर्व माहिती बनावट असल्याचे नंतर समोर आले. गुंतवणूक योजना खरी असल्याचा विश्वास बसल्याने करंगळे यांनी आरोपींच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या वेळी मोठ्या रकमा वर्ग केल्या. मात्र, गुंतवणुकीवरील परतावा मिळण्याऐवजी त्यांच्या खात्यातून तब्बल २५ लाख ७९ हजार २७६ रुपये वळते करण्यात आले. या प्रकरणात आरोपींनी ९४३४३९११३६, ९११७०६९१४८, ७६३२५४९३३, ६२८०१५४८०३ आणि ९५७४३२८७२१ या मोबाइल क्रमांकांचा वापर केल्याचे तक्रारीत नमूद आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, तोतयागिरी व बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. बँक व्यवहार, संबंधित मोबाइल क्रमांक, व्हॉट्सॲप ग्रुप आणि बनावट ॲपच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फसवणुकीची रक्कम परत मिळविण्यासाठीही पोलिसांकडून संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे.