‘डिजिटल अरेस्ट’च्या नावावर महिलेची ४५.५० लाखांनी फसवणूक

ईडी, सर्वोच्च न्यायालय, आरबीआयच्या नावाने बनावट कागदपत्रे

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
digital arrest ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी खामला-सोमलवाडा परिसरातील ७२ वर्षीय महिलेला तब्बल ४५ लाख ५० हजार २०० रुपयांचा गंडा घातला. महिलेच्या नावाने कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले असून, त्यातून दोन कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचे सांगून आरोपींनी महिलेला अटक करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी महिलेने आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये लाखो रुपये वर्ग केले. या प्रकरणी मालती पांडुरंग भाजीपाले (७२), रा. वर्धा रोड, यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ७ सप्टेंबर रोजी ही फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. २२ सप्टेंबर रोजी महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर दोन मोबाइल क्रमांकधारकांसह इतर अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 

nagpur woman loses rs 45.50 lakh in digital arrest scam using fake ed, supreme court and rbi documents
पोलिसांच्या माहितीनुसार, मालती भाजीपाले या घरी असताना त्यांना ७४१६५२९५६३ आणि ७२९७९०९५२१ या मोबाइल क्रमांकांवरून फोन आले. आरोपीने स्वतःची ओळख ‘प्रदीप जयस्वाल, कुलगाव पोलिस ठाणे’ अशी करून दिली. त्याने महिलेच्या नावाने कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले असून, या खात्यातून तब्बल दोन कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगितले. याच पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करून आरोपींनी महिलेला अटक करण्याची भीती दाखवली. त्यानंतर ‘तुमच्यावर कारवाई होणार आहे’, असे सांगत तिच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला.
ईडी, सुप्रीम कोर्ट, आरबीआयच्या नावाने गंडा
आरोपींनी महिलेचा विश्वास बसावा यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवली. त्यानंतर महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कथित तपासाचा भाग म्हणून पैसे विशिष्ट खात्यांमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले.
अटक होण्याच्या भीतीने महिलेने आरोपींच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि वेगवेगळ्या व्यवहारांतून एकूण ४५ लाख ५० हजार २०० रुपये आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये वर्ग केले. मात्र, त्यानंतरही आरोपींकडून संपर्क सुरू राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रांचा वापर आणि तोतयागिरीशी संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित बँक खाती, मोबाइल क्रमांक आणि पैशांच्या व्यवहारांचा तपास करून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे