नागपूर
New English High School, Congress Nagar पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजावी आणि प्रत्येकाने आपल्या परिसरातील झाडांची जबाबदारी घ्यावी, या उद्देशाने काँग्रेसनगर येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये २०० रोपट्यांचे वाटप करण्यात आले. वनविभागाच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी रोपटे स्वीकारून ते मोठे होईपर्यंत त्याची काळजी घेण्याचा संकल्प केला.झाडांचे महत्त्व केवळ पुस्तकातून न शिकता प्रत्यक्ष कृतीतून समजून घ्यावे, तसेच आपल्या परिसरात उपयुक्त झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनचे सदस्य मंगेश वालेकर यांनी केले.

यावेळी एनसीसी व नेव्ही कॅडेट्सना विशेषतः रोपट्यांचे वाटप करण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सामूहिक देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.पर्यावरण संवर्धनाचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजताना पाहून आनंद होत असल्याचे तरूणभारत संपर्क मित्र उपक्रमाच्या गौरी सरनाईक यांनी व्यक्त केले.यावेळी मंगेश वालेकर, गौरी सरनाईक, तरूणभारतच्या विडिओ क्रिएटर पल्लवी हडप, मुख्याध्यापक नरेंद्र रंगारी, सकाळ विभागप्रमुख सतीश भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता बर्वे यांनी केले.
सौजन्य:सतीश भोयर,संपर्क मित्र