एकही शेतकरी वंचित राहणार नाही, भरीव मदत देणार

मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
बुलढाणा
farmer Minister Makarand Patil पावसातील खंड, अनियमित पर्जन्यमान आणि त्यामुळे पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी थेट शेताच्या बांधावर पोहोचून पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी तातडीने अचूक पंचनामे पूर्ण करावेत. शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी असून बाधित शेतकर्‍यांना भरीव मदत करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
 
makrand patil
पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दि. २४ सप्टेंबर रोजी चिखली तालुयातील केळवद, मौजे मालगणी, बेराळा, वसंतनगर व सरंबा, तसेच सिंदखेडराजा तालुयातील सावरगाव माळ येथे शेताच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती, उत्पादनावर होणारा परिणाम तसेच शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या अडचणींची माहिती घेतली. जिल्ह्यातील पीक परिस्थिती व नुकसानीचा प्रशासकीय यंत्रणेकडून आढावा घेण्यात आला असून, त्याआधारे शासनस्तरावर लवकरच मदतीबाबत निर्णय होईल, असे ना. मकरंद पाटील यांनी सांगितले. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे अचूक व वस्तुनिष्ठ पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचा सिंचनासाठी योग्य वापर करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.
 
दौर्‍यादरम्यान सिंदखेडराजा तालुयातील खडकपूर्णा धरणाचीही पालकमंत्र्यांनी पाहणी केली. धरणातील सद्य पाणीपातळी, उपलब्ध पाणीसाठा तसेच सिंचनासाठी उपलब्ध होणार्‍या पाण्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. पिण्याच्या पाण्याचे आवश्यक आरक्षण करून उपलब्ध पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन व आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी आ. श्वेता महाले, आ. मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विजय सवळे, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.