शहरभरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी निराधार

"ओसीडब्ल्यू"चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
ocw शहरातील पाणीपुरवठ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान 'ऑरेंज सिटी वॉटर' (ओसीडब्ल्यू) कंपनीने प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायालयात आपले स्पष्टीकरण दिले आहे. शहरात संपूर्णपणे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे व दिशाभूल करणारे असल्याचा दावा कंपनीने न्यायालयात केला आहे.
 

nagpur, nagpur news, ocw, orange city water, water supply, contaminated water, nagpur water, nagpur high court, bombay high court, water pollution, drinking water, water quality, nagpur civic news, unauthorized connections, pipeline damage, nagpur latest news, maharashtra news, high court news 
शहरातील ९ झोनमध्ये दूषित पाणी पुरवले जात असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने याची दखल घेत स्वतःहून जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ओसीडब्ल्यू कंपनीला नोटीस बजावून उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ओसीडब्ल्यूने आपली बाजू मांडताना फेब्रुवारी २०२६ मधील काही स्थानिक आणि विशिष्ट घटनांच्या आधारे संपूर्ण शहरात दूषित पाणी पुरवले जात असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. याचिकेत नमूद आकडेवारीत तफावत असून प्रयोगशाळेतील नमुने, दुरुस्तीच्या जागा आणि कॉल सेंटरवरील तक्रारी हे तीन वेगवेगळे घटक आहेत. एकाच समस्येसाठी अनेक नागरिक फोन करत असल्याने तक्रारींचा आकडा प्रत्यक्ष घटनेपेक्षा जास्त दिसू शकतो असे ओसीडब्ल्यूचे म्हणणे आहे.
नियमांपेक्षा ५ पट अधिक चाचण्या
केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (सीपीएचईईओ) नियमांनुसार ३० लाख लोकसंख्येसाठी दरमहा ३०० नमुने तपासणे बंधनकारक असते; मात्र कंपनी दरमहा १,५०० ते १,७०० नमुन्यांची चाचणी करते. तसेच पेंच १, २, ३, ४ आणि कन्हान प्रकल्पांमध्ये डिस्इन्फेक्शन, सेडिमेंटेशन आणि फिल्टरेशन अशा तीन टप्प्यांत पाणी शुद्ध केले जाते. दररोज ९० नमुने गोळा करून ७० नमुने प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत (आरपीएचएल) आणि २० नमुने 'एनएबीएल' मान्यताप्राप्त मध्यवर्ती प्रयोगशाळेत तपासले जातात. तसेच दररोज १०० ठिकाणी पाण्यातील थेट क्लोरीनचे प्रमाण तपासले जाते असे ओसीडब्ल्यूने सांगितले.
बॉक्स
अनधिकृत नळ जोडण्या खंडित
शहरातील बेकायदेशीर जोडण्यांमुळे ड्रेनेजचे पाणी पाइपलाइनमध्ये शिरत असून, मे २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान शहरातील ७,३१० अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तसेच रस्ते, मेट्रो, केबल आणि गडरच्या खोदकामामुळे २०२५ मध्ये १४७ वेळा तर २०२६ मध्ये (ऑगस्टपर्यंत) १०९ वेळा पाइपलाइनचे नुकसान झाले. पादचारी मार्गावरील फुटलेल्या गडर चेंबरचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनच्या संपर्कात येत असल्याने समस्या निर्माण होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
रोबोटिक तंत्रज्ञानाने अडथळे शोधण्यात यश
पाइपलाइनमधील गळती व अंतर्गत अडथळे शोधण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून 'इंटरनल इन्स्पेक्शन रोबोटिक कॅमेरा' या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, शहरात आतापर्यंत १,१४३ किमी जुन्या पाइपलाइन बदलण्यात आल्या असून दरवर्षी सुमारे ४२ किमी पाइपलाइन बदलल्या जात असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद आहे. तसेच गिट्टीखदान परिसरातील निखारे लेआउट येथे गडर चेंबर तुंबून फुटल्यामुळे जमिनीखाली घाण पाणी पसरले होते. या स्थानिक घटनेचा फटका केवळ ३५ कुटुंबांना बसला होता आणि ती समस्या तातडीने सोडवण्यात आली. शहरात इतर कुठेही साथीचा आजार पसरलेला नाही, असा स्पष्ट दावा कंपनीने प्रतिज्ञापत्रात केला आहे.