काबुल,
Pakistan's air strike on Afghanistan पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या सैन्याने गुरुवारी पहाटे अफगाणिस्तानमधील १० ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणांचा वापर आदल्या दिवशी पाकिस्तानवर ड्रोन हल्ले करण्यासाठी करण्यात आला होता. या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील सीमावर्ती परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे.पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी गुरुवारी हवाई कारवाईची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अफगाण तालिबान सैन्याने पाकिस्तानच्या दिशेने आठ ड्रोन पाठवले होते आणि पाकिस्तानी सीमा चौक्यांवर गोळीबारही करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने सीमापार घुसखोरीचा प्रयत्न रोखल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, पाकिस्तानने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांबाबत काबूलकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दरम्यान, अफगाण तालिबान सरकारचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानच्या दाव्याला विरोध केला आहे. अफगाण तालिबान सैन्याने पाकिस्तानवर कोणताही हल्ला केल्याचे त्यांनी बुधवारी नाकारले होते. त्याचवेळी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी पूर्व अफगाणिस्तानमधील दहशतवादी तळ असल्याचा दावा केलेल्या ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली होती.यापूर्वी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, कोहाट आणि सीमावर्ती तोरखम परिसरात घुसखोरीचा प्रयत्न होत असताना सुरक्षा दलांनी अफगाण तालिबानकडून उडवण्यात आलेले आठ ड्रोन पाडले. स्थानिक पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांचा सीमापार प्रवेश रोखल्यानंतर तालिबान सैन्याकडून रात्रीच्या वेळी पाकिस्तानी सीमा चौक्यांवर तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला.
दोन्ही देशांमधील तणावाची पार्श्वभूमी यापूर्वीही पाहायला मिळाली आहे. जुलैमध्ये अफगाण हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करून आयसिसच्या दहशतवादी तळांवर हवाई कारवाई केल्याचे वृत्त आले होते. तालिबानने या कारवाईला पाकिस्तानविरोधातील प्रत्युत्तर म्हणून संबोधले होते. बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा परिसरातील आयसिसच्या तळांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानातील १० ठिकाणांवर करण्यात आल्याचा दावा केलेला हा ताजा हवाई हल्ला आणि त्याआधीच्या ड्रोन व सीमावर्ती घटनांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याचे चित्र आहे. या घडामोडींमुळे दक्षिण आशियातील प्रादेशिक स्थैर्याबाबतही चिंता निर्माण झाली आहे.