पालघर
palghar factory accident पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाली पोशेरी परिसरातील ‘टीना रबर’ कारखान्यात आवारातील भिंत अचानक कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत तीन कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून केशव गुणगुणा, रंजना कोंब आणि मीरा गवळी अशी मृतांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. ढिगारा हटवून मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उत्तरीय तपासणीसाठी ते रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. भिंत नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग येथे जीर्ण घराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला होता. खेंदाड गल्लीत पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत मीनल ठोंबरे आणि त्यांच्या मावशी सुमन पारदे यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर लगेचच वाड्यातील औद्योगिक परिसरात तीन कामगारांचा बळी गेल्याने जीर्ण आणि धोकादायक बांधकामांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष होत असल्यास अशा दुर्घटनांना निमंत्रण मिळू शकते. ‘टीना रबर’मधील कोसळलेली भिंत आधीपासूनच जीर्ण अवस्थेत होती का, तिची नियमित देखभाल करण्यात आली होती का आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच औद्योगिक सुरक्षा विभागामार्फत परिसरातील सर्व कारखान्यांचे सुरक्षा ऑडिट करावे, अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या दुर्घटनेच्या तपासासोबतच औद्योगिक आस्थापनांमधील सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष स्थितीही तपासण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.