मुंबई/बुलढाणा
rahul bondre बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना अचानक नवे वळण मिळाले आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केलेले काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजप प्रवेशाच्या काही तासांपूर्वीच ते नॉट रिचेबल झाले असून त्यांचा मोबाईल बंद असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्याचदरम्यान बोंद्रे यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदलला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे समर्थक मानले जाणारे राहुल बोंद्रे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची तयारी सुरू झाली होती.
मात्र, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राहुल बोंद्रे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर राजकीय चित्र अचानक बदलल्याचे सांगितले जात आहे. संकटाच्या काळात धीर सोडू नका, असे आवाहन राहुल गांधी यांनी केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा शब्द बोंद्रे यांनी गांधी यांना दिल्याची माहिती आहे.
राहुल गांधी यांच्याशी झालेल्या कथित फोन संभाषणातील व्हायरल व्हिडिओमध्ये बोंद्रे यांनी, “तुमचा फोन आल्यामुळे मी माझा निर्णय बदलत आहे आणि सर्व गमावलं तरी मी तुमच्या सोबत कायम लढत राहील,” असे म्हटल्याचे दिसत आहे. त्यामुळे बोंद्रे काँग्रेसमध्येच राहणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली.
मात्र आता पुन्हा एकदा परिस्थिती संभ्रमाची झाली आहे. आज त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा असतानाच बोंद्रे नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली. रात्रीपासून त्यांचा मोबाइल बंद असल्याचे सांगितले जात असून, ते दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, मुंबईत त्यांच्या भाजप प्रवेशाची तयारी सुरू असल्याची चर्चा होती.
या सगळ्या घडामोडींमध्ये बोंद्रे यांनी प्रवेशाच्या काही वेळ आधी केलेली फेसबुक पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. “बचेंगे तो और भी लडेंगे”- कर्मयोगी तात्यासाहेबांची शिकवण.. असे कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट केली. त्यामुळे बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय पुन्हा बदलला आहे का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये जाण्याची घोषणा, त्यानंतर राहुल गांधी यांच्याशी फोनवर चर्चा आणि आता भाजप प्रवेशाच्या आधीच नॉट रिचेबल होणे, या घटनांमुळे बुलढाण्याच्या राजकारणात मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. राहुल बोंद्रे नेमका कोणता निर्णय घेणार आणि त्यांचा भाजप प्रवेश होणार की ते काँग्रेसमध्येच राहणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.