नागपूर
railway reservation दिवाळीत विदर्भात घरी येण्याचे नियोजन करणाऱ्या नागपूरकर आणि विदर्भवासीयांना रेल्वे आरक्षणाने पहिल्याच दिवशी धक्का दिला. नोव्हेंबरमधील ६० दिवस आधीचे आरक्षण परवा सकाळी ८ वाजता सुरू होताच नागपूर मार्गावरील सर्व प्रमुख रेल्वेगाड्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल झाल्या.पुणे, मुंबई, दिल्लीहून नागपूर-विदर्भात येणाऱ्या नागपूर-पुणे एक्सप्रेस, अजनी-पुणे, महाराष्ट्र एक्सप्रेस, गरीब रथ, हमसफर या रेल्वेगाड्यांना सणासुदीच्या दिवसांत सर्वाधिक मागणी असते. यावेळीही पैसे भरेपर्यंत जागा उपलब्ध नाहीचा संदेश आला, तर अनेकांना प्रतीक्षा यादीतही तिकीट न मिळता ‘रिग्रेट’ आले. नागपूरहून कोलकाता, दिल्ली, पाटणाकडे जाणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, दानापूर एक्सप्रेसचीही तीच स्थिती आहे. नागपूर स्थानकावरील आरक्षण खिडकीवर पहाटेपासून रांगा लागूनही अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागले.
नागपूरकरांची व्यथा
शिक्षण आणि नोकरीनिमित्त पुणे-मुंबईत स्थायिक झालेला विदर्भातील मोठा वर्ग दरवर्षी दिवाळीला घरी येतो. यंदा ६० दिवस आधी तयारी करूनही तिकीट न मिळाल्याने अनेक कुटुंबांचे नियोजन कोलमडले आहे. रेल्वे प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर-पुणे, नागपूर-मुंबई, नागपूर-दिल्ली मार्गावर दिवाळी विशेष रेल्वेगाड्या जाहीर कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. तसेच ऑनलाईन बुकिंगमध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरून तिकिटे लंपास करणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याची मागणीही नागपूरकर करीत आहेत. विशेष रेल्वेगाड्यांच्या घोषणेची प्रतीक्षा करणे किंवा जास्त पैसे मोजून खाजगी बसेसने प्रवास करणे, हा एकच पर्याय सध्या नागपूरकरांसमोर आहे.