मुंबई
rain news एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल होत असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा पावसाच्या मोठ्या तुटीमुळे धरणातील पिण्याच्या पाण्याची पातळीही कमी राहिलेली आहे. राज्यातील अनेक भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची शक्यता आहे. २५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर पुणे शहर आणि घाट परिसरात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढचे दोन-तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक असू शकेल. छत्रपती संभाजीनगर, जालना येथे वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत पोहोचू शकेल. परभणी, बीड, लातूर, धाराशिव येथेही वाऱ्यांचा वेग अधिक असू शकेल. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली येथे नागपूर, यवतमाळ, भंडारा येथे ऑरेंज ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात सध्या १७ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे, तर संपूर्ण देशाचा विचार केल्यास सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रातून नैर्ऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास साधारणपणे ५ ऑक्टोबरच्या सुमारास सुरू होण्याची शक्यता आहे. १० ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यातील बहुतांश भागांतून माघार घेईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.