नागपूर,
raipur-public-library यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (वायसीसीई), नागपूरच्या ग्रंथालयातर्फे उन्नत भारत अभियानांतर्गत रायपूर ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक वाचनालयाला १०० हून अधिक पुस्तके भेट देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांना विविध विषयांवरील ज्ञान सहज उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमासाठी वायसीसीईचे प्राचार्य डॉ. उदय वाघे तसेच अधिष्ठाता, नियोजन व विकास डॉ. अरविंद भगत पाटील यांनी विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. पुस्तकदान कार्यक्रमाला रायपूर ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश आंबटकर, उपसरपंच चिराग शेटे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसचिव शैलेंद्र टेंभुर्ने, सार्वजनिक वाचनालयाचे ईश्वर डोंगरे व इतर कर्मचारी, गावातील मान्यवर नागरिक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी अनुराग रुंधे, हिमांशू किरपाल, उन्नती हर्षे, निर्जन राऊत, रौनित यादव, मुस्तकीम शेख, चिन्मय यादव आणि कनाड नेऊरगावकर उपस्थित होते. वायसीसीई ग्रंथालयातील डॉ. राजेंद्र पहाडे, देवराव काळे आणि संजय जाधव यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.
उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील निवडलेल्या गावांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रायपूर ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक वाचनालयाला ही पुस्तके देण्यात आली. या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना विविध विषयांवरील पुस्तके सहज उपलब्ध होणार असून त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासोबतच वाचनाची आवड जोपासण्यासही मदत होणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत आणि सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी वायसीसीईच्या ग्रंथालयाचे तसेच प्रशासनाच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक करून आभार व्यक्त केले. ग्रामीण भागात वाचन संस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. वायसीसीईच्या ग्रंथालयातर्फे शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध संस्था तसेच सार्वजनिक वाचनालयांना पुस्तके उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.