शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘रासरंग’ दांडिया रद्द

उत्सवाचा निधी बळीराजाच्या मदतीसाठी वळवणार

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
मुंबई
funds महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाअभावी बळीराजासमोरील संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटल्याने पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली असून, त्याचा फटका खरीप हंगामाबरोबरच रबी पिकांनाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव यंदा रद्द करून त्यासाठी होणारा खर्च संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 

funds  
डोंबिवलीतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी ‘रासरंग’ दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र यंदा महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये शेतीचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन हा उत्सव न घेण्याचा निर्णय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षी दांडिया उत्सवासाठी करण्यात येणारा खर्च यंदा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी वळवण्यात येणार आहे. ही मदत महाराष्ट्रातील कोणत्या भागातील शेतकऱ्यांना आणि कोणत्या स्वरूपात द्यायची, याबाबतचे नियोजन सध्या सुरू असल्याचेही सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात उत्सवावरील खर्चाला वेगळे वळण देण्याच्या या निर्णयाची चर्चा होत आहे.
मात्र, नवरात्रोत्सवाची धार्मिक परंपरा खंडित होणार नाही. देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना यंदाही केली जाणार असून, ती साधेपणाने पार पाडण्यात येणार आहे. उत्सवाचे स्वरूप मर्यादित ठेवत उपलब्ध निधी शेतकरी मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील funds शेतीच्या परिस्थितीवरून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी याआधी शरद पवार यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चिंताजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचे म्हटले आहे.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियमांनुसार खरीप हंगामातील दुष्काळ जाहीर करण्यासाठीचे मूल्यांकन मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर, म्हणजेच ५ ऑक्टोबरनंतर सुरू होऊ शकते. तर रबी हंगामासाठी दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन मार्च २०२७ मध्ये केले जाऊ शकते. त्यामुळे राज्यातील पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक परिणाम याकडे आता लक्ष लागले आहे.