चेन्नई,
Ruturaj's captaincy in jeopardy. चेन्नई सुपर किंग्सने IPL 2027 पूर्वी कोचिंग व्यवस्थेत मोठा बदल करत स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान यांची हेड कोच म्हणून नियुक्ती केली आहे. जहीरच्या आगमनानंतर आता ऋतुराज गायकवाडच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महेंद्रसिंह धोनीनंतर 2024 मध्ये ऋतुराजकडे CSKचे नेतृत्व सोपवण्यात आले. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली संघाला सलग तीन हंगाम प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. 2024 मध्ये CSK पाचव्या, तर 2026 मध्ये आठव्या स्थानावर राहिली. 2025 मध्ये ऋतुराज दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर धोनीने पुन्हा नेतृत्व केले, तरी संघ तळाच्या स्थानावर राहिला.2026 पूर्वी CSKने रवींद्र जडेजाच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला संघात घेतले. संजूला नेतृत्वाचा अनुभव असल्याने कर्णधारपद बदलण्याची चर्चा झाली होती. मात्र फ्रेंचायझीने ऋतुराजवरील विश्वास कायम ठेवला.

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ऋतुराजला कर्णधारपदावरून हटवण्याची शक्यता कमी आहे. CSKच्या संघरचनेचा तो दीर्घकाळ भाग असून संघाची कार्यपद्धती त्याला चांगली माहिती आहे. त्याचबरोबर महेंद्रसिंह धोनीचाही ऋतुराजवर विश्वास असल्याचे मानले जाते.विशेष म्हणजे जहीर खान यांच्या नियुक्तीमागे धोनीची भूमिका असल्याचे CSKचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी सांगितले आहे. त्यामुळे जहीरच्या आगमनानंतरही ऋतुराजचे कर्णधारपद कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऋतुराजला आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचाही अनुभव आहे. 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये त्याने भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. पावसामुळे अंतिम सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि सीडिंगच्या आधारावर भारताला सुवर्णपदक देण्यात आले होते.दरम्यान, IPL 2027 पूर्वी हार्दिक पांड्याच्या ट्रेडची चर्चाही सुरू आहे. मुंबई इंडियन्स आणि CSK यांच्यात हार्दिकच्या ट्रेडबाबत चर्चा असल्याचे वृत्त आहे. मात्र या व्यवहाराची अधिकृत पुष्टी झालेली नाही. हार्दिक चेन्नईत आल्यास कर्णधारपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येऊ शकतो. जहीर खानच्या नियुक्तीने CSKच्या कोचिंग व्यवस्थेत बदल झाला असला, तरी कर्णधारपदाचा अंतिम निर्णय फ्रेंचायझीच्या पुढील निर्णयांवर अवलंबून असेल. IPL 2027 पूर्वीचे मिनी ऑक्शन आणि संभाव्य ट्रेडनंतर CSKच्या नेतृत्वाचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.