मुंबई
shah rukh khan बॉलिवूडचा ‘बादशाह’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान याच्या संपत्तीत यंदा मोठी घट नोंदवण्यात आली आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६ नुसार शाहरुखची एकूण संपत्ती १० हजार कोटी रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी हीच संपत्ती १२ हजार ४९० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे वर्षभरात त्याच्या नेटवर्थमध्ये तब्बल २ हजार ४९० कोटी रुपयांची घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
विशेष म्हणजे संपत्तीत घट होऊनही शाहरुखने भारतातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्याचा मान कायम राखला आहे. २०२६ च्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या यादीत त्याची संपत्ती १० हजार ८०० कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतरच्या आकडेवारीनुसार ती आता १० हजार कोटी रुपयांवर आली आहे.
शाहरुखच्या एकूण संपत्तीमध्ये त्याचे बँक बॅलन्स, आलिशान वाहने आणि मुंबईतील घरासह त्याच्या व्यावसायिक उपक्रमांचा समावेश आहे. त्याची निर्मिती संस्था रेड चिलीज एंटरटेनमेंट तसेच नाइट रायडर्स फ्रँचायझीमधील व्यावसायिक हितसंबंध हे त्याच्या संपत्तीचे महत्त्वाचे घटक मानले जातात.
हुरुनच्या यादीत शाहरुखनंतर अमिताभ बच्चन यांचा क्रमांक आहे. अमिताभ यांच्या संपत्तीत मात्र यंदा लक्षणीय वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. २०२५ मध्ये त्यांची संपत्ती १ हजार ६३० कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले होते; यंदाच्या यादीत ती ४ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते.अभिनेत्यांच्या या यादीत सलमान खान ३ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे २०२५ च्या यादीत सलमान खानचे नाव नव्हते. त्यानंतर हृतिक रोशनचा क्रमांक लागतो. हृतिकची नेटवर्थ यंदा २ हजार ५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले असून, २०२५ मध्ये ती २ हजार १६० कोटी रुपये होती. म्हणजेच त्याच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. हृतिकच्या ब्रँड ‘एचआरएक्स’च्या व्यवसायामुळे त्याच्या संपत्तीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, मागील हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये अभिनेत्री जूही चावला आणि चित्रपट निर्माते करण जौहर यांचाही समावेश होता. मात्र, २०२६ च्या यादीत या दोघांची नावे नसल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे बॉलिवूडमधील काही प्रमुख कलाकारांच्या संपत्तीत यंदा मोठे बदल झाले असले, तरी शाहरुख खानने भारतातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्याचे अव्वल स्थान कायम ठेवले आहे.